पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/203

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लुगडी, डोक्यावर भाकरीपासून सरपणापर्यंत प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे गाठोडे अशा अवतारातील शेतकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसू लागल्या. १९८० सालापासून असे महामेळावे वीसपंचवीस झाले. प्रत्येक वेळी ही सारी मंडळी कोणत्या भावनेने पेटून चूल बंद करून घराला कुलूप लावून शेतकरी संघटनेच्या सभांना यायला निघतात, शेकडो किलोमीटरचा प्रवास आगगाडीच्या डब्यात दाटीवाटीने बसून सारे काही सोसत करतात? हे मला अजून उमगलेले नाही; पण हे होते, प्रत्येक वेळी होते, न चुकता होते. संघटनेच्या प्रेमापोटी लोक हे करतात असे कोणी म्हटले तरी धन्य धन्य वाटते. ४ एप्रिलच्या रात्रीपासून टेलिफोनवर निरोप येऊ लागले - खांडव्यापासून ते आग्र्यामथुरेपर्यंत सर्व रेल्वे स्टेशनांचे फलाट लाल बिल्लावाल्या स्त्रीपुरुषांनी लगडून भरले आहेत; मंडळी थोडीफार तीर्थयात्रा करीत, प्रेक्षणीय स्थळे पाहत 'किसान कुंभा'साठी दिल्लीकडे निघाली आहेत. आकाशाला दोन बोटेसुद्धा पुरती न राहिल्याचा भास झाला.

 ६ एप्रिल उजाडला; मेळावा दुपारी एक वाजता सुरू व्हायचा होता. सकाळी उठून, पुंडलिकाच्या दर्शनाला आलेल्या या विठोबारखमायांचे दर्शन घेण्याकरिता मी स्टेडियमकडे गेलो. केवढे प्रचंड आवार ते! दोन फेऱ्या पुऱ्या घालणेसुद्धा आता प्रकृतीला झेपणे शक्य नाही. भोवतालचा हिरवळीचा सारा भाग लोकांनी फुलून गेला होता. सकाळच्या चहापाण्याच्या तयारीत सारे होते. कोठे न्याहरीसाठी दशम्या सुटत होत्या, कोठे कोठे लाकडे पेटवून चूल करण्याचा प्रयत्न चालू होता. स्टेडियम खेळांच्या सामन्यांसाठी आहे, त्यामुळे शेकडोंनी स्वच्छतागृहे आहेत - चांगली पांढऱ्या स्वच्छ फरशीची, भरपूर पाण्याचा पुरवठा असलेली. या व्यवस्थेचेच अनेकजण कौतुक करीत होते. सार्वजनिक स्वच्छतागृहात जाण्याच्या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा येतो. या साध्याभोळ्या जीवांची सुखाची माफक कल्पना पाहूनही डोळे ओलावले. समोरून एक, चिंध्यांचे पागोटे घातलेला म्हातारा माझ्याकडे धावत येऊ लागला; लोक त्याला अडवीत होते. 'मला भेटायचंय, भेटायचंय', असे ओरडत तो माझ्याजवळ येऊन पोहोचला; अक्षरशः गळ्यात मिठी घालून ओक्साबोक्शी रडू लागला. "साहेब, भाई धारिया गेले; सुभाष जोशी आता आपल्यातले राहिले नाहीत, पण त्यांना निरोप देऊन निपाणी भागातून मी एकटा आलो." काहीसा अभिमान, काही आक्रोश आणि प्रचंड आनंद अशा मिश्र स्वरात तो बोलत होता. १९८० मध्ये विडीतंबाखूच्या भावासाठी निपाणीच्या रस्त्यावर आम्ही चाळीस हजार शेतकरी २३ दिवस रस्ता रोखून बसलो होतो. २३व्या दिवशी दसरा होता, तो

अन्वयार्थ – दोन / २०५