पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अध्यक्षांना दुराग्रह सोडून देण्यास भाग पाडले.
 क्लिंटन यांच्याच कारकिर्दीत व्यापाराच्या जागतिकीकरणाचा कालखंड सुरू झाला आणि गणकयंत्राच्या तंत्रज्ञानाचेही युग झपाट्याने पुढे आले.
 हैदराबाद येथे केलेल्या भाषणात क्लिंटन यांनी म्हटले, 'माझ्या लहानपणी चिप म्हणजे बटाट्याचा खाण्याचा पदार्थ होता आणि डिस्क म्हणजे पाठीच्या मणक्याचा एक भाग होता; पण गेल्या काही वर्षांत या सर्व संज्ञांचे अर्थच पालटून गेले.'
 सेल्युलर फोनच्या साहाय्याने जगातील कोणतीही व्यक्ती कोठूनही पाहिजे त्या व्यक्तीशी कोठेही ताबडतोब संपर्क साधू लागली ही गोष्ट काही वर्षांपूर्वी अरबी भाषेतील सुरस कथांतील हकिकतींइतकी चमत्कारिक वाटली असती. आता हे प्रत्यक्ष हरदिन डोळ्यासमोर घडते आहे. समाजवादाच्या पाडावानंतर अमेरिका एकमेव महासत्ता राहिली आणि सारे जग व्यापार आणि आधुनिक संचारतंत्रामुळे पहिल्यांदा अगदी छोटे बनले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून क्लिंटन यांच्यावर इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात मोठी जबाबदारी येऊन पडली.
 भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांत वर्षानुवर्षे अमेरिका आणि पाकिस्तान यांचे विशेष सलोख्याचे संबंध राहिले आहेत. SEATO चे सदस्य राहिलेले पाकिस्तान आणि ऊठसूट रशियाची भलावण करणारा, अगदी रशियाच्या हंगेरी, अफगाणिस्तान यांवरील आक्रमणाचेही समर्थन करणारा भारत अशा परिस्थितीत अमेरिकेचे पाकिस्तानच्या बाजूने झुकते माप काहीसे समजण्यासारखे आहे.

 आता रशिया एक दुय्यम महासत्ता बनली; भारतातही नेहरू परंपरेतील कवित्वबुद्धीच्या मुत्सद्देगिरीचे युग संपले आणि जसवंतसिंग यांच्यासारख्या परखड परराष्ट्रमंत्र्याच्या हाती निर्णयाची जबाबदारी गेली. तेवढ्यात पोखरणच्या अणुचाचण्या झाल्या; पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर दिले. कारगिलवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खोडसाळपणा जगजाहीर झाला; पण त्याचबरोबर, काश्मीर साऱ्या जगाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक ज्वालाग्राही भांडार बनले. दोनही देश अणुचाचण्यांवर बंदी घालण्यास नाराज आणि दोन्ही देशांत अणुबॉम्बचा प्रत्यक्ष उपयोग करण्याइतकी असमंजस नेतृत्वाची मुबलकता. भरीस भर म्हणून तिसऱ्या जगातील हे दोन मोठे देश जगात बहुराष्ट्रीय खुल्या व्यापाराची पद्धती आणण्यास नाराज. अशा परिस्थितीत क्लिंटन यांची उपखंडाची भेट ठरली. एक दिवस बांगला देश, पाच दिवस भारत आणि पाच तास पाकिस्तान. पाकिस्तानची भेट

अन्वयार्थ – दोन / २२