पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही सार्वत्रिक धारणा सर्वदूर पसरली. सामान्य माणसाची ही स्थिती तर सत्ताधाऱ्यांचे काय विचारावे? सत्ता म्हणजे भ्रष्टाचार, अनिर्बंध सत्ता म्हणजे अनिर्बंध भ्रष्टाचार हे लॉर्ड ॲक्टनचे वाक्य सर्वमान्यच आहे. हा भ्रष्टाचार करताना सत्तेची सर्व साधने वापरावी. सहकाराचा स्वाहाकार करावा, सरकारही विक्रीस काढावे आणि त्यातून उभा झालेला पैसा वापरून निवडणुका जिंकाव्यात व पुन्हा एकदा सत्ता जिंकावी असे सत्ता आणि मत्ता यांचे दुष्टचक्र गतिमान झाले.
 सत्तासंपत्ती आणि भ्रष्टाचार हे द्वंद्व मोडण्याकरिता समाजवाद्यांनी एक नवीन तत्त्वज्ञान काढले. 'ज्याने त्याने समाजाला आपल्या कुवतीप्रमाणे द्यावे आणि समाजाकडून गरजेपुरतेच घ्यावे' या पायावर सारी समाजव्यवस्था आधारली म्हणजे भ्रष्टाचाराचे नावच राहणार नाही, अशी त्यांची कल्पना; पण ती पूर्णतः फसली. समाजवादाच्या माहेरघरीसुद्धा 'कमीत कमी द्यावे आणि जास्तीत जास्त उकळावे' अशीच समाजरीती रूढ झाली.
 गांधीजींनी हाच प्रश्न सोडविण्यासाठी विश्वस्ताची कल्पना मांडली. सत्तासंपत्ती असलेल्यांनी आपल्याकडे ती केवळ ठेव म्हणून असल्याचे मानावे म्हणजे त्याचा उपभोग स्वार्थासाठी होणार नाही अशी त्यांची कल्पना. गांधीजींचा खटाटोपही व्यर्थ झाला. त्यांचे इतिहासप्रसिद्ध अंत्येवासी भ्रष्टाचारात आकंठ बुडून गेले.
 चित्रगुप्ताची जागा आता स्पर्धा घेईल या आशेवर स्वतंत्रतावादी खुल्या बाजारपेठेचा पुरस्कार करीत होते. स्पर्धेचे जाते देवाच्या गिरणीप्रमाणे पीठ चांगले दळते; पण फार मंद गतीने दळते. खलनायकांच्या पापांचे सर्व घडे भरले म्हणजे त्यांना आपोआप सजा मिळेल असे गृहीत धरले तरी इतका वेळ सारे सोसणे कोणालाही अशक्य होते.
 यातूनच बॉलिवूडच्या चित्रपटांत दिसणारा 'ढिश्याँव ढिश्याँव' नायक उभा राहिला; पण असली स्टंटबाजी सामान्यांना जमणारी नाही आणि त्यातील रक्तपात सदभिरुचीस धरून नाही. मग, सदाचाराचा पाठीराखा कोण? या प्रश्नाने समाजाला ग्रासले.

 सामान्य माणसाचा आधार इतिहासात एकच दिसून येतो. त्याचे जे काही भले झाले ते तंत्रज्ञानामुळे. भारतापुरताच आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कालखंडाचाच विचार करायचा म्हटले तरी हे स्पष्ट होते. स्वातंत्र्यानंतर भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वावलंबी झाला, गोरगरिब खाऊ लागली याचे कारण कोणी नेहरू नाही, कोणी समाजवादी नियोजन नाही, हा चमत्कार घडला तो संकरित वाणांच्या हरितक्रांतीने.

अन्वयार्थ – दोन / १९३