पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/18

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



बुझावी क्लिंटन तेंचि लीळा वदावी


 क्लिंटन, बिल क्लिंटन, विल्यम जेफर्सन क्लिंटन किंवा साधे सुटसुटीत बिल म्हणजे जगातील सर्वांत प्रबळ महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष; ज्याच्या एका शब्दामुळे जागतिक अर्थकारणाची दिशा बदलू शकते आणि ज्याने आज्ञा दिली तर सद्दामसारख्या हुकुमशहाला दाती तृण धरावे लागते; थोडक्यात, जगातील सर्वांत सामर्थ्यवान पुरुष.
 १९ मार्चपासून ते २५ मार्चपर्यंत सात दिवस भारतीय उपखंडात क्लिंटन दौऱ्यासाठी आले होते. सात दिवस सर्व दृक्श्राव्य प्रसारमाध्यमांत सर्वांत गाजणारा विषय म्हणजे क्लिंटनयात्रा. १९ तारखेला पालम विमानतळाच्या तांत्रिकी विभागात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे एअर फोर्स नं. १ हे विमान उतरले तेव्हापासून त्यांची प्रत्येक बारीकसारीक हालचाल सर्व माध्यमे टिपीत होती आणि त्यावर टीकाटिप्पणीही करीत होती. २५ मार्च रोजी मुंबईच्या विमानतळावरून, विमानांची लपाछपी खेळत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष छोट्याशा जेट विमानातून, इस्लामाबादला गेले आणि तेथून मायदेशी जाण्यासाठी रवाना झाले. सगळ्या उपखंडात एकदम शांत, स्तब्ध वातावरण पसरले. तसे म्हटले तर, विशेष नवे असे काहीच घडले नाही. पण, उपखंडातील दोन्ही देशांत क्लिंटनयात्रेच्या पूर्वीचा कालखंड आणि नंतरचा कालखंड असे दोन सरळ विभाग पाडावे इतका फरक पडून आला आहे.

 भारतातील जनसामान्यांना क्लिंटन साहेबांचा व्यक्तिगत परिचय फार तोटका आहे. बिल नावाच्या एका शाळकरी मुलाने योगायोगाने प्रेसिडेंट जॅक केनडी यांच्यासमोर आल्यावर आपले चिमुकले हात हस्तांदोलनाकरिता पुढे केले. राष्ट्राध्यक्षांनी काही काळ ते हात हातात घेतले आणि प्रेमळपणे दाबले आणि छोट्या बिलच्या मनात आपणही राष्ट्राध्यक्ष व्हावे ही महत्त्वाकांक्षा तयार झाली.

अन्वयार्थ – दोन / २०