पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/170

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पहिल्या मुहूर्तालाच आंतरराष्ट्रीय कायदातज्ज्ञांचे नशीब फळफळले आहे. 'ए.डी. डाचा'चे मालक त्यांतील फक्त एक.
 जे काही घडते आहे त्याला आपल्या देशाच्या इतिहासात एक उदाहरण आहे. इंग्रजांचे राज्य आले आणि त्यांनी देशातील पूर्वापार चालत आलेली 'गावची जमीन, पंचायतीची मालकी, गावाचे कुरण' ही व्यवस्था मोडून गावकीमध्ये होणाऱ्या जुलुमजबरदस्तीला आळा घालण्याचे ठरविले. जमिनीची मालकी सरकारकडे घेतली, पट्टे खासगी नावांनी केले आणि जागोजागी सोयीप्रमाणे जमीनदारही नेमले. खासगी मालकीची ही संकल्पनाच अनोळखी असलेल्या भारतासारख्या देशात मोठा हलकल्लोळ उडाला. केरळातील मोपले सरळ सरळ बंड करून उठले. जिल्ह्यांच्या आणि तालुक्यांच्या कोर्टातही, जमिनीच्या पट्ट्यावर आपले नाव लागावे म्हणून लाखोंनी कैफियती दाखल झाल्या. जमीनपट्टी भरता न आल्यामुळे सावकारांनी, जमीनदारांनी आणि सरकारने वहिवाटदारांच्या विरुद्ध अनेक खटले लावले. गावोगावच्या वकिलांचे भाग्य फळफळले. महात्मा जोतीबा फुले यांनी वर्णन केलेली परिस्थिती तालुक्यातालुक्यात झाली. 'वादीच्या वकीलाने शेतकऱ्याला न समजणाऱ्या भाषेत कैफियत द्यावी, प्रतिवादीच्या वकीलाने तितक्याच बोजड इंग्रजीत त्याला उत्तर द्यावे; आपल्या नशिबाचा काय फैसला चालला आहे याची गरीब कुणब्याला पुसटशीही कल्पना येऊ नये. खटल्याच्या शेवटी वकिलाने 'तुमची जमीन गेली, पाटील,' असे सांगितले, की तोंडात माती घालीत, आक्रंदत मुलाबाळांत परतायचे' हा प्रकार सर्रास घडू लागला. वकिलांचे फावले. वकिलीसारखा उद्योग नाही अशी स्थिती झाली. मोठ्या घरांतील मुलेसुद्धा शिकून शिकून मामलेदार वकील आणि त्याहून उंच उडी असली तर बॅरिस्टर होण्याची स्वप्ने पाहू लागली. प्रत्यक्षात पॅरिसहून कोणी कपडे धुवून आणीत असेल ही शक्यता नाही; पण तशी वदंता पसरण्याइतकी श्रीमंती वकिलांच्या घरी पाणी भरू लागली; 'ए.डी. डाचा' लाही लाजवितील अशी 'आनंदभवने' देशभर उभी राहू लागली.

 जागतिक पातळीवर व्यापार खुला करण्याच्या कार्यक्रमात आज 'आनंदभवन' युग सुरू झाले आहे. नियम किंवा कायदे केले, की 'वांधे' उभे राहणारच. ते निस्तरण्याची काही यंत्रणा पाहिजे, त्या यंत्रणेतील समर्थांची 'दाही बोटे तुपात' असणार; परंतु जमीनसुधारणा करण्याकरिता इंग्रजांनी जी आडदांड पद्धत वापरली त्यात अडाणी शेतकरी भरडून निघावा आणि उच्चभ्रू वर्गाचे भले व्हावे हे अपरिहार्य होते. इंग्रजी राज्यकर्त्यांना या परिणामांची कल्पना आलीच नसावी हे

अन्वयार्थ - दोन / १७२