पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विमानात बसताना प्रेसिडेंट क्लिंटन यांच्या मनात कारगिल, काश्मीर आणि अणुबाँब यांच्या धोक्यापेक्षा खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अमेरिकेत होऊ शकणाऱ्या संभाव्य उत्पातांचे विचार अधिक घोळत असतील. भारतासारख्या देशात मजुरीचे दर कमी आहेत, निदान अमेरिकेसारख्या देशांच्या तुलनेने तरी कमी आहेत. त्यामुळे, स्वस्त मजुरीच्या उत्पादनाने अमेरिकेच्या व्यापारास धोका पोहोचेल ही शक्यता नाकारता येत नाही. मजुरांची परिस्थिती सुधारली पाहिजे, त्यांना माणसासारखे जगता आले पाहिजे यातही काही वाद नाही. पण, ज्या देशात मजुरीचे दर कमी आहेत त्यांच्या विरुद्ध व्यापारी कारवाई करण्याची तरतूद आंतरराष्ट्रीय व्यापार करारात असणे कितपत योग्य आहे हा मोठा वादाचा मुद्दा आहे.
 श्रीमंत देशांतील कामगारांच्या प्रतिनिधींच्या लक्षात एक महत्त्वाची गोष्ट येत नाही. हिंदुस्थानातील बऱ्यापैकी कारखान्यांत कामगारांना दिवसाकाठी जास्तीत जास्त १०० ते २०० रुपये रोज मिळतो. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून हा रोज, म्हणजे दोन ते चार डॉलर प्रतिदिन, अगदीच अपुरा आहे. अशा अपुऱ्या मजुरीच्या साहाय्याने तयार झालेल्या मालाविरुद्ध अमेरिकन कारखानदारीचे संरक्षण झाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. चार डॉलरचा रोज, श्रीमंत राष्ट्रांच्या दृष्टीने, माणसाप्रमाणे जगण्यास अपुरा आहे. पण, हिंदुस्थानसारख्या देशांत २०० रुपये प्रतिदिन हा रोज फारच थोड्या भाग्यवंतांच्या वाट्याला येतो. भारतातील ४ ते ५ टक्के संघटित कामगारांनाच अशा प्रकारच्या वेतनांचा लाभ मिळणे शक्य असते. या उलट, बहुसंख्य असंघटित कामगारांचे वेतन ५० ते ७५ सेंट म्हणजे २० ते २५ रुपये इतपतच असते. संघटित कामगारांची वेतनश्रेणी वाढविली तर असंघटित कामगारांच्या पदरात पडणारे वेतन आणखी खाली जाईल. थोडक्यात, मानवाधिकाराच्या नावाखाली, मजुरांची परिस्थिती सुधारावी याकरिता संघटित कामगारांचे वेतन वाढविले तर त्याचे गंभीर दुष्परिणाम खऱ्याखुऱ्या गरीब व असंघटित कामगारांवर मोठ्या भयानक रीतीने होणार आहेत.

 जागतिक व्यापार संघटने (WTO)च्या वाटाघाटी लवकरच सुरू होत आहेत. क्लिंटन आणि वाजपेयी यांच्या भेटीत जर का जागतिक व्यापारासंबंधी करारमदारांत मजुरांची परिस्थिती व पर्यावरणाचे रक्षण यासंबंधी काय तरतुदी असाव्यात याविषयी काही ठोस निर्णय झाले तर ते अण्वस्त्रचाचणीबंदीच्या आणि काश्मीर प्रश्न सोडवणुकीच्या पेक्षाही, जगातील साऱ्या देशांच्या साऱ्या लोकांच्या दृष्टीने, अधिक महत्त्वाचे ठरणार आहे. या दृष्टीने पाहिले तर क्लिंटन यांनी जाता जाता

अन्वयार्थ – दोन / १८