पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अव्याहत भगीरथ प्रयत्न करीत असे.
 पण, आयात म्हणजे वरपासून खालपर्यन्त नुकसानीचीच बाब ही कल्पना खरी नाही. जगाशी व्यापारी संबंध ठेवणे, इतर देशांशी वस्तू वा सेवा यांची देवघेव करणे हे लाभदायक आहे यात काही शंका नाही. जागतिक व्यापारामुळे जो तो देश ज्या वस्तू उत्पादन करण्यात काही नैसर्गिक सोय असेल त्याच वस्तू तयार करतो, जागतिक श्रमविभागणी होते आणि निर्यात करणाऱ्यांचा तर फायदा होतोच होतो; पण आयात करणाऱ्यांचादेखील फायदा होतो.
 जगाशी संपर्क तेवढा वाईट ही कल्पना इंग्रजी अमदानीच्या पहिल्या काळात आग्रहाने, राष्ट्रवादी आवेशाने त्या काळचे पुढारी मांडीत. त्याला अपवाद फार थोडे. त्यांतील एक जोतीबा फुले. इंग्रजाचे राज्य आले नसते तर बरे झाले असते. पण, आले आहे हे खरे. ते काही कायम टिकणार आहे असेही नाही. कधीतरी त्यांना या देशावरील सत्ता सोडून द्यावीच लागेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण, इंग्रजांच्या संपर्काचे काही विलक्षण लाभही समोर वाढून आले आहेत. इंग्रजी राज्यामुळे नवे ज्ञान आले, तंत्रज्ञान आले. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता तो मिळू लागला. अशा परिस्थितीत, इंग्रजांविरुद्ध विद्वेष पसरवून सामाजिक सुधारांखेरीज राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरणे म्हणजे इंग्रजांनंतर पुन्हा एकदा पेशवाईलाच निमंत्रण देणे आहे, असे जोतीबा फुल्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

 जगाशी जितका अधिक संपर्क तितकी माणसाची आणि पर्यायाने, देशाची क्षितिजे रुंदावतात हा एकच फायदा 'केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार' ही उक्ती सिद्ध करण्यास पुरेसा आहे.
 एका उदाहरणाने ही कल्पना स्पष्ट व्हावी. दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देश आकारमानाने हिंदुस्थानच्या तुलनेत अगदीच लहान. आज भारतीयांत गणकयंत्राच्या क्षेत्रात आपल्याला काही विशेष बुद्धी आहे अशी एक सार्वत्रिक भावना आहे. ही वल्गना फक्त गणकयंत्राच्या आज्ञावली-भाषेविषयी खरी आहे. गणकयंत्राच्या अभियांत्रिकीविषयी नाही. १९८५ मध्ये ब्राझील देशाने गणकयंत्रांच्या उत्पादनात इतकी मोठी आघाडी मारली, की आता गणकयंत्रे किंवा त्यासाठी लागणारे पुष्कळ सामान आयात करण्याची काहीही गरज नाही अशी तेथील स्वदेशीमंचवाले ओरड करू लागले. त्यांनी जिंकले आणि त्यांच्या सरकारला गणकयंत्रे आणि त्यासाठी आवश्यक सामानाच्या आयातीवर बंदी घालावी लागली. परिणाम असा झाला, की ब्राझीलचा जगाशी संपर्क तुटला; गणकयंत्राच्या क्षेत्रात जे नवेनवे तंत्रज्ञान दिसामासाला उदयाला येत आहे त्याच्याशी त्या देशाचा संबंध

अन्वयार्थ – दोन / ११३