पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






ससा आणि कासव - २०००


 १९८२ मध्ये दिल्ली येथे आशियाड खेळांच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सारी दिल्ली राजधानी नटूनथटून सज्ज झाली होती. नवी क्रीडांगणे, खेळाडूंसाठी वसतिगृहे, प्रेक्षकांसाठी तारांकित हॉटेले, वाहतूक सुरळीत चालावी म्हणून नवे वाहतूक पूल, नव्या बसगाड्या, स्वच्छ रस्ते, सुंदर क्रीडांगणे सारे काही जादूची कांडी फिरल्यासारखे उभे राहिले. खेळांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मोठा शानदार झाला. आशियाड खेळ दिल्लीत घेऊ नयेत, त्यापेक्षा ही साधनसामग्री आर्थिक विकासाच्या कामाकरिता वापरली गेली तर देशाचे आणि गोरगरिबांचे भले होईल. त्यात आणखी पंजाब पेटला आहे. असे रडगाणे गाणाऱ्यांनासुद्धा आपण भारतीय असल्याचा अभिमान उद्घाटनाचा सोहळा पाहताना वाटला. खेळ संपले, परदेशी मंडळी आपापल्या घरी परतली आणि थोडक्याच काळात दिल्लीने आपले कायमचे बकाली स्वरूप धारण केले.
 गेल्या महिन्यात सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धा झाल्या. सिडनीसारखी व्यवस्था आणि नियोजन येत्या वीसपंचवीस वर्षांततरी दिल्लीत होईल असे वाटत नाही.
 सिडनी खेळांच्या शेवटी जो उत्सवाचा जल्लोश झाला, आकाश आणि धरती उजळून टाकणारी जी रोषणाई झाली ते दूरदर्शनवर पाहूनच प्रेक्षकांचे डोळे तृप्त झाले. ऑलिम्पिक खेळही संपले. आता सिडनी शहराची काय अवस्था असेल? पुन्हा एकदा कोणत्याही मोठ्या शहराप्रमाणेच सिडनी गबाळ दिसू लागले असेल काय? नक्कीच नाही.

 चार वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातील सेऊल येथे ऑलिम्पिक खेळ झाले होते. त्या वेळी सेऊल नगरी अशीच नटली होती. आज तेथे कोणी प्रवासी पाहुणा

अन्वयार्थ – दोन / १०७