पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्भकांना, कुटुंबनियोजनाच्या निमित्ताने, काटून टाकणे यात कोणताच शहाणपणा नाही.
 मधल्या काळी बिहारमध्ये नोकरीवरून काढून टाकलेले किंवा संपावर असलेले नोकरदारसुद्धा कचेरीतील आपल्या नियोजित जागांवर येऊन बसत. त्यांना पगार कोणी देत नव्हते तरीसुद्धा त्यांनी कचेरीत येणे सोडले नव्हते. याचे मोठे कारण म्हणजे त्यांना कचेरीत मिळणारे वरकड उत्पन्न इतके मोठे होते की त्या मानाने त्यांना पगाराची फारशी पत्रास नव्हती. भ्रष्टाचार, निदान किरकोळ भ्रष्टाचार कमी करण्याचा एक मार्ग मी सुचविला आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाने आपले सर्व सामान बाहेरच्या प्रवेशद्वारापाशी सोडावे, अंगझडती करवून आत जावे आणि मगच त्यांनी आपली उपस्थिती मांडावी. आणि, परत जाताना अशीच झडती करवून घेऊन आपले येताना जमा केलेले सामान परत घेऊन बाहेर पडावे. असे केले म्हणजे मालकाची लूट करणारे नोकरदार आटोक्यात येतील.
 समाजवादी रशियाचा पाडाव झाला त्यामुळे आपल्या देशातील तथाकथित शोषितांच्या चळवळीच्या नेत्यांची मोठी गोची झाली. जागतिक व्यापार संघटनेच्या करारमदारांमध्ये वेठबिगारीवर बंदी असावी, पर्यावरणाला धोका पोहोचविणारे तंत्रज्ञान वापरले जाऊ नये अश्या तऱ्हेचे कार्यक्रम हे तथाकथित 'आहे रे' राष्ट्रांनीच हाती घेतल्यामुळेतर परंपरागत डाव्या विचारांच्या लोकांची मोठी गोची झाली.
 धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? आपण धर्मनिरपेक्ष व्यवस्थेत आहोत काय? अल्पसंख्याक कोण आणि हिंदू कोण? या प्रश्नांसंबंधीचा वादविवाद आजही चालू आहे. त्या वेळी, 'साम्ययोग'मध्ये पुन्हा एकदा छापल्या गेलेल्या विनोबाजीच्या, 'हिंदुत्वा'ची व्याख्या देण्याऱ्या लेखाच्या संबंधाने आजच्या या वादविवादाची मर्यादा एका लेखामध्ये मी स्पष्ट केली आहे.
 नोकरशहांविषयीचा माझा राग हा स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानातून निघणारा आहे. एका काळी इंग्रजी राज्यात खुद्द गव्हर्नर जनरलसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिताना 'आपला विश्वासू आणि आज्ञाधारक' म्हणून सही करीत असे. याउलट, स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये 'आपण जनतेचे नोकर आहोत' ही वस्तुस्थिती विसरून नोकरशहांची दंडेली माजली आहे.
 शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या अर्थशास्त्राचे एक वेगळे दर्शन घडविण्याचा मी प्रयत्न केला. 'शेतकरी एक बी पेरून हजारो

नऊ