पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संरक्षण असणे ही मोठी प्रतिष्ठेची गोष्ट वाटू लागली आहे. या संरक्षणव्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च होतात. एवढेच नव्हे तर हा खर्च भरून देण्याची या पुढाऱ्यांची तयारी नसते. एवढे संरक्षण देऊनसुद्धा इंदिरा गांधींचे संरक्षण होऊ शकले नाही, राजीव गांधींचे संरक्षण होऊ शकले नाही आणि खुद्द महात्मा गांधींचेही संरक्षण होऊ शकले नाही. याकरिता आतंकवादापासून संरक्षणाची व्यवस्था अशी असली पाहिजे की, ज्यामध्ये समाजातील कोणत्याही सर्वोच्च अधिकाऱ्याच्या किंवा अतिविशिष्ट व्यक्तीच्या जागी दुसरी तितकीच सक्षम व्यक्ती उभी करता येईल. अशी व्यवस्था झाली तर आतंकवाद्यांना काही कामच उरणार नाही आणि त्यांची शस्त्रे बोथट होऊन जातील.
 खुल्या व्यवस्थेसंबंधी आणि खुल्या बाजारपेठेसंबंधी पुष्कळ चर्चा चालू आहे. त्यातील एक भीती अशी दाखविली जाते की, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे दरवाजे उघडले की परदेशातून प्रचंड प्रमाणावर माल देशात येऊन पडेल आणि देशात प्रचंड प्रमाणावर बेकारी माजेल. खिडकी उघडल्याने हवा फक्त बाहेरून आत येते असे नव्हे तर आतील कोंदटलेली हवासद्धा बाहेर पडते या आधाराने, गेल्या काही शतकांमध्ये बाहेरून येणारे तंत्रज्ञान, बाहेरून येणारी संपत्ती यांनी सबंध हिंदुस्थानचा किती फायदा झाला आहे याचाही आलेख मी शब्दांकित केला आहे. बुखारेस्टपासून ते कैरोपर्यंत संयुक्त राष्ट्रसंघाने लोकसंख्याविषयक अनेक परिषदा भरविल्या आणि त्यांच्या आधाराने देशोदेशी कुटुंबनियोजन कसे करावे याच्या योजना आखल्या गेल्या आणि त्यावर अब्जावधी रुपये खर्च केले. प्रत्यक्ष अनुभव पाहिला तर गरीब समाजामध्ये लोकसंख्यावाढीची गती खूपच जास्त असते. त्या मानाने संपन्न, सुबत्ता असलेल्या समाजामध्ये मुलांना जन्म देण्याची प्रवृत्ती आपोआपच कमी होऊन जाते. याचे एक कारण असे की मुले म्हणजे आपल्या वृद्धापकाळातील संरक्षणाची तरतूद होतील या कल्पनेने मुलांना जन्म दिला जातो. आणि, जर आरोग्यव्यवस्था चांगली नसेल तर पाचसहा मुले जन्मली तर त्यांतील एखादातरी जगून आपल्याला म्हातारपणी काठीचा आधार होईल या कल्पनेने लोकसंख्या वाढत जाते. संपन्नता हे कुटुंबनियोजनाचे सर्वात मोठे साधन आहे ही कल्पना अजूनही स्वीकारली जात नाही. याउलट, आजही एचआयव्हीग्रस्त लोकांवर अब्जावधी रुपये खर्च करून त्यांना जगविण्याचा आणि त्यांची प्रजाही जगविण्याचा प्रयत्न चालू आहे. खरे म्हणजे एका बाजूला एचआयव्हीग्रस्तांना जिवंत ठेवण्यासाठी धडपड करणे आणि बरोबरच म्हाताऱ्यांनाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणे व न जन्मलेल्या

आठ