पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/6

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तंत्रज्ञानाचा विषय हा तसा शेतीशी जोडलेलाच आहे. चारशे वर्षांपूर्वी, 'जमीन आकाराने वाढत नाही, याउलट खाणारी तोंडेमात्र वाढतात; त्यामुळे भूकमारी, रोगराई आणि युद्धे ही मानवजातीची अपरिहार्य नियती आहे', असे भाकित डॉ. माल्थस यांनी केले होते. ते खोटे ठरले. याचे कारण, शेतीची जमीन तेवढीच राहिली तरी शेतीमध्ये, मनुष्याच्या प्रज्ञेने आणि प्रतिभेने तयार झालेल्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादन कित्येक पटींनी वाढले आणि आज लोकसंख्या अनेक पटींनी वाढूनसुद्धा सर्व प्रजा कधी नव्हे इतक्या चांगल्या तऱ्हेने खातपीत आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रत्येक पायरीवर पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. जेव्हा आगगाड्या सुरू झाल्या तेव्हाही त्यांनी विरोध केला, हरित क्रांतीच्या वेळी रासायनिक खतेऔषधे आली त्यालाही त्यांनी विरोध केला, गणकयंत्रे आली तेव्हाही त्यांनी विरोध केला. प्रत्येक वेळी पर्यावरणवाद्यांच्या बीमोड झाला आहे तरी त्यांची तंत्रज्ञानाला विरोध करण्याची खोड जात नाही. आजही जैविक वांग्यांच्या निमित्ताने ते आपली तंत्रज्ञानाच्या विरोधाची भूमिका पुन्हा एकदा मांडीत आहेत. यामध्ये त्यांचा हेतू प्रामुख्याने, येणाऱ्या गाड्याला अपशकून करून नाव मिळविणे हा असावा ही भूमिका या संग्रहातील काही लेखांत मी मांडली आहे.
 मनुष्यजातीची प्रगती होते ती प्रामुख्याने धडाडी दाखविणाऱ्या संशोधक प्रतिभाशाली नेतृत्वामुळे होते. सर्वसाधारण जनतेला या प्रतिभाशाली धडाडीच्या नेतृत्वाबद्दल मनामध्ये एक प्रचंड मत्सर असतो. इतरांनी प्रतिभा दाखवावी, धोका पत्करून संशोधन करावे आणि त्याचे फळ आपल्याला बिनबोभाट मिळावे अशी त्यांची अपेक्षा असते. अश्या तऱ्हेने, प्रतिभावान थोडे आणि प्रतिभेचा लाभ घेऊ इच्छिणारे अधिक अशी परिस्थिती असल्यामुळे लोकशाही व्यवस्थेमध्ये म्हणजे 'एक डोके, एक मत' निवडणुकीच्या आधाराने चालणाऱ्या व्यवस्थेमध्ये प्रतिभाशाली प्रज्ञावंतांचा विजय होण्याची शक्यता नाहीच. आजच्याही राजकारणात हे आपण प्रत्यक्षात पहातोच आहोत.
 पोशिंद्यांना प्रोत्साहन देण्याच्या कार्यक्रमाऐवजी 'आम आदमी'चे भले करण्याच्या नावाने त्यांना भीक आणि अनुदाने वाटण्याचे कार्यक्रम निवडणुकीत अधिक यशस्वी होतात आणि देशाने तेजस्विता दाखविण्याऐवजी जो येईल त्याच्या पुढे मान खाली घालावी व शरणागती पत्करावी अश्या तऱ्हेच्या 'भाईभाईवादा'लाही निवडणुकीमध्ये भरपूर जनमताचा पाठिंबा मिळतो. कधीकाळी जगातील प्रतिभावंत, धडाडी दाखविणारे, उद्योजक या छळाला कंटाळून गेले तर काय होईल या विषयी एक सुंदर कल्पना प्रख्यात लेखिका आयन रँड यांनी मांडली आहे. त्या

सहा