पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चूक, असल्या तर्कशास्त्रात काय असेल ते रहस्य असो; पण लोकशाहीप्रेम मात्र नावालासुद्धा नाही."
 मैदान तिरपागडे नको
 लोकशाहीत शेवटचा निर्णय निवडणुकीने मतपेटीद्वारे झाला पाहिजे ही गोष्ट खरी; पण निवडणुका स्वच्छ आणि मोकळ्या वातावरणात पार पडल्या पाहिजेत हीही बाब तितकीच महत्त्वाची. मैदानी खेळात आम्ही सामना जिंकून दाखवू आणि प्रतिपक्षाला मैदानात नामोहरम करू ही जिद्द योग्य; पण त्यासाठी मैदान तिरपागडे असता कामा नये. हातात सुरे घेऊन मैदानात उतरलेल्या संघाबरोबर हुतूतूचा सामना कसा काय खेळला जाणार?
 धर्माच्या, जातीच्या नावाने राजकारण करू पाहणारी मंडळी निवडणुकीचे मैदानच तिरपागडे करू पाहतात. म्हणूनच त्यांच्यावर बंधने घालण्याचा प्रश्न निर्माण होतो. शरद पवार तेवढे निवडणूक धीट आहेत आणि बाकीचे निवडणुकांना घाबरतात हे काही खरे नाही.
 धर्मजातीच्या नावाचा उपयोग करणारे लवकरच संपणार आहेत यात शंका नाही. त्यांचा अगदी लवकरच निवडणुकीतही धुव्वा उडणार आहे आणि हे पाचदहा वर्षांत घडणार आहे नक्की; पण खेळाचे मैदानच उद्ध्वस्त करणाऱ्या गुंडांना स्पर्धांत उतरू दिले तर ते पाचदहा वर्षे खेळाचे भवितव्य बरबाद करू शकतात. म्हणून निवडणुकीच्या मैदानात ज्यांना उतरायचे आहे त्यांनी निवडणुकीचे नियम कसोशीने पाळले पाहिजेत असे म्हणण्यात लोकशाही मार्गापासून दूर गेले असे मुळीच होत नाही. हे मैदान पवित्र आहे, त्याचे काही नियम आहेत, ते पाळा आणि अवश्य मैदानात उतरा.
 खेळांच्या स्पर्धांप्रमाणे निवडणुकातही कोण हरले कोण जिंकले याला महत्त्व नाही,खेळाचे नियम टिकले पाहिजेत हे महत्त्वाचे.
 संघटनांना जाच, पक्ष बिनधास्त
 निवडणुका न लढवणाऱ्या अनेक संघटना असतात. त्यांनी गुन्हेगारी आणि असामाजिक कृत्ये करू नयेत एवढीच अपेक्षा असते. जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, भाषेच्या नावाने, प्रदेशाच्या नावाने वा इतर कोणत्याही मिषाने संघटना काढायची खुलेआम परवानगी असलीच पाहिजे. हिंदुस्थानात शेकडो सुना दरवर्षी जळून मरतात; पण तरीही पाचपन्नास पत्नीपीडित पुरुषांना संघटना बांधायची असेल तर त्याला आडकाठी असता कामा नये; पण अशा संघटनांनी पक्ष बनायचे ठरवले आणि निवडणूक लढवायची ठरवली; की लोकशाही

अन्वयार्थ - एक / ४३