पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/37

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रवेश करायला का कू करीत नाही. अधिकृतरीत्या चीन अजूनही कम्युनिस्ट देश आहे; पण लालबावटा फडकत ठेवूनही चिनी सरकारने खुली अर्थव्यवस्था देशात आणण्याचा कार्यक्रम मोठ्या नेटाने चालवला आहे. काही वर्षांपूर्वी 'तिएनमेन' चौक विद्यार्थ्यांनी अडवला आणि मोठी निदर्शने केली. त्यांच्यावर लष्करी कारवाई झाली. हजारो विद्यार्थी मेले. अत्यंत क्रूर आणि कठोर अशा या कार्यवाहीमुळे चिनी राज्यकर्त्यांविरुद्ध काही काळ बराच आरडाओरडा झाला होता; पण निषेधाचा सूर ओसरत गेला. चीन ज्या ध्यैर्याने आणि सातत्याने खुल्या अर्थव्यवस्थेचा पाठपुरावा करीत आहे त्याबद्दल जगभर मोठी कौतुकाची भावना आहे. परिणामतः 'तिएनमेन' चौकात कत्तली करणाऱ्या कर्दनकाळांच्या देशात अमेरिकी, जपानी आणि युरोपियन भांडवल आज आनंदाने प्रवेश करीत आहे. याउलट अयोध्येच्या दंगलीनंतर परकीय भांडवल धास्तावले आणि भारतात प्रवेश करण्यास तयार नाही, हे काय रहस्य आहे?
 दंगलींचे विषय
 पहिली गोष्ट म्हणजे, चीनमध्ये स्वातंत्र्याकरिता विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि तेथील शासनाने महाक्रूरतेने भले चिरडून टाकले हे खरे! पण या सगळ्या प्रकरणामुळे चिनी समाज आधुनिक युगातील आहे. मागासलेला नाही हे स्पष्ट झाले. चिनी आंदोलनाचा हेतू आर्थिक, सामाजिक आहे. आधुनिक युगाशी संबंधित आहे. या उलट अयोध्या वादाचा स्पष्ट अर्थ असा, की भारतीय समाज अजून चालू मनूत आलेलाच नाही. तो मध्ययुगातच आहे. भारतातील दंग्यांचे विषयसुद्धा आधुनिक नाहीत, त्रेता युगातील आहेत. अशा प्रवृत्ती जेथे मूळ धरून आहेत तेथे उद्या काय होईल हे काय सांगावे? देवळाकरिता एवढा कल्लोळ माजवणाऱ्या देशातील जनता आधुनिक कारखानदारीच्या युगात बसू शकेल किंवा नाही याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निदान गुंतवणूकदारांच्या मनात तरी नक्कीच.
 गुंतवणूक करणाऱ्यांच्या हिशेबात दंगल होणे महत्त्वाचे नाही. दंगली होतच असतात. दंगली काय कारणाने होतात, कोणत्या विषयावर होतात हे जास्त महत्त्वाचे. याच विषयावर भारत नापास झाला आहे.
 नादान सरकार
 भारतात प्रवेश करण्यास भांडवल नाउमेद होण्याचे याहूनही एक मोठे कारण आहे. दंगली झाल्या, समजण्यासारखे आहे; पण या सर्व प्रकरणात भारतातील कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेबद्दल मोठा अविश्वास निर्माण झाला

अन्वयार्थ - एक / ३८