पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/36

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चित्र नव्हतेच. यापलीकडे, हिंदुस्थान म्हणजे गरीब देश. तेथे भिकारी, साधू आणि फकीर फिरत असतात. गायी रस्त्यावर बसलेल्या असतात. सगळे राज्य लाल फितीचे आहे. लाच दिल्याखेरीज कोणतेच काम होत नाही. हिंदुस्थानात भांडवल गुंतवले आणि उद्योगधंदे उभे केले तरी सरकारची मर्जी केव्हा फिरेल आणि केव्हा चंबूगबाळे आवरावे लागेल ते सांगता येत नाही अशी धास्ती परदेशी गुंतवणूकदारांच्या मनात वर्षानुवर्षे होती. तेव्हा डॉ. मनमोहनसिंग यांनी गुंतवणुकीवरील निबंध सैल केले, म्हणजे भांडवलाचे प्रवाह धो धो वाहत देशात प्रवेश करतील अशी काही शक्यता नव्हती.
 भांडवलदारांची मनधरणी
 नुसते दरवाजे उघडून भागले नसते. इतकी वर्षे दरवाजाबाहेर उभ्या केलेल्या भांडवलदारांची मिनतवारी आणि मनधरणी करणे आवश्यक होते. त्यामुळे अर्थमंत्री, पंतप्रधान, देशोदेशी जात होते. तेथील उद्योजकांना भारतात गुंतवणुकीस मोठा वाव आहे असे पटवून देण्याचा प्रयत्न करीत होते. खुल्या अर्थव्यवस्थेचे धोरण हे कायम टिकणारे धोरण आहे, आता पुन्हा नेहरू व्यवस्था आणली जाणार नाही असे आश्वासन देत होते. अशा भगीरथ प्रयत्नांनी भांडवलाची गंगा लहान ओहळाच्या स्वरूपात का होईना भारतात अवतीर्ण होईल अशी चिन्हे दिसू लागली होती.
 हर्षद आणि राम
 नव्याने बुजऱ्या आणि लाजऱ्या पावलांनी भारतात प्रवेश करणाऱ्या या भांडवलाला पहिला अपशकुन झाला तो शेअर मार्केटातील घोटाळ्याचा. हिंदुस्थानातील बाजारपेठेच्या व्यवस्थेबद्दल एवढेच नव्हे तर बँका आणि सरकारी संस्था यांच्या विश्वसनीयतेलाच मोठा धक्का पोचला. शेअर बाजार कोसळला आणि नवे भांडवल देशात यायचे तर सोडाच, परदेशीय आणि अनिवासी भारतीय यांनी त्यांच्या हिंदुस्थानातील ठेवी परत न्यायला सुरुवात केली.
 या संकटातून देश बाहेर पडतो, ना पडतो तोच अयोध्या प्रकरण उपटले आणि या वेळी परदेशी भांडवल बुजून गेले. एवढेच नाही तर पार लांब निघून गेले आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी संकल्पित प्रकल्प भारताऐवजी दुसऱ्या देशात वळवायला सुरुवात केली आहे.
 चीन आणि भारत
 विदेशी भांडवल दंगलीमुळे होणाऱ्या अस्थैर्याला आणि अनिश्चिततेला घाबरले असे म्हणता येणार नाही. कारण चीनसारख्या देशात अगदी अमेरिकी भांडवलसुद्धा

अन्वयार्थ - एक / ३७