पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


पाहिजे 'एक सरकार'


 डिसेंबरला अयोध्येत आक्रीत घडले, त्यातून दंगली उद्भवल्या. दंगलीचे शेपूट अजूनही ठिकठिकाणी वळवळत आहे. मुंबईत आणि अहमदाबादेत दंग्याचा फडा अजून फुत्कारत आहे. या महिन्यातील मुंबईच्या १० दिवसांच्या दंगलीत ठार झालेल्यांचा आकडा ६०० वर गेला, आणखी कित्येक हजारो जखमी झाले, त्यातील पुष्कळसे अपंग झाले. औद्योगिक उत्पादनांचे नुकसान ६५० कोटींवर झाले असेल असा अंदाज आहे.
 सूर्य तळपतील चंद्र झळकतील
 चालतीबोलती माणसे निघून गेली. त्यांच्या विधवांचे आणि अनाथ मुलांचे दुःख काय सांगावे? जवळच्या परिवारातील सगेसायरे काही काळाने डोळे पुसतील आणि कामी लागतील. बाकीचा समाज सगळे काही पटकन विसरून जाईल. अपंगही मोडक्या हातापायांनी कामाला लागतील. झोपडपट्ट्या जळल्या, तेथे नवीन गगनचुंबी इमारतींचे बांधकाम चालू होईल. औद्योगिक उत्पादनात झालेले नुकसानही भरून निघू शकेल. सगळा राक्षसीपणा ओसरून जाऊन माणसे पुन्हा माणसे बनतील; पण या दंगलीत यापलीकडे एक नुकसान झाले आहे. त्याची भरपाई व्हायला किती वर्षे लागतील कुणास ठाऊक! केवळ तीस दिवसांत सारा देश जगाच्या नजरेत रानटी झाला आहे.
 बंदिशाळा भारत
 स्वातंत्र्यानंतरच्या काळात हिंदुस्थान आंतरराष्ट्रीय बंदिस्त देश राहिला. म्हणजे परदेशीयांना येथे येऊन व्यापार करण्याची शक्यता नव्हती किंवा कारखानदारीत गुंतवणूक करण्याची मुभा नव्हती. परदेशांशी व्यापार करून काय माल आयात करायचा हे ठरवणे संपूर्णपणे सरकारच्या हाती होते. त्यांची परवानगी मिळाली तरच परदेशातील माल येथे येऊ शके. याला अपवाद अर्थातच लपूनछपून

अन्वयार्थ - एक / ३५