पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/312

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणीवपूर्वक तोलूनमापून केला असावा. स्वतःचे सैन्य न पाठवता शत्रू राष्ट्रातील पंचम स्तंभीयामार्फत घातपाताच्या विविध कारवाया घडवून आणून शत्रुराष्ट्रांची संरक्षण व्यवस्था, आर्थिक कारभार आणि मनोधैर्य खचवणे हे अपरोक्ष युद्धाचे तंत्र म्हणजे कमी खर्चातील लढाई आहे. एकदा युद्ध पेटले म्हणजे अब्जावधी रुपयांचा हरदिन चुराडा होऊन जातो. अपरोक्ष युद्धात काही कोटी रुपयांची काम भागून जाते. पाकिस्तानचे आकारमान पाहता हिंदुस्थानविरुद्ध बांगलादेश सदृश कारवाई करण्याचा अयूबखानी-याह्याखानी मूर्खपणा पुन्हा करणे असंभव आहे. अपरोक्ष स्वस्तातील युद्ध हा एकमेव मार्ग पाकिस्तानी युद्धखोरांना खुला आहे आणि ते यापुढेही वापरणार आहेत.
 मुंबईवरील हल्ल्याचा मुंहतोड जबाब पाहिजे
 मुंबईतील दंग्यांमागे आणि बॉम्बस्फोटापासून नायकाच्या हत्येपर्यंत सगळ्या विद्रोहो घटनामागे पाकिस्तानी हात आहे, असे मुख्यमंत्री तर म्हणत आहेतच, गृहमंत्र्यांनीही असेच विधान निक्षून केले आहे. पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाची पंजाब आणि काश्मीर यांबरोबरच मुंबई ही तिसरी आघाडी झाली आहे. पंजाब आणि काश्मीरमधील घातपातांच्या प्रकारांइतकेच प्रकार मुंबईत होत आहेत. तिथल्याइतकीच येथील पोलिस व्यवस्था कोसळली आहे. एवढेच नव्हे तर त्यातील एक मोठा भाग धातुपात्यांना सामील झाला आहे. मुंबई हे देशातील अर्थव्यवहाराचे केंद्रस्थान आहे. मुंबई विस्कळीत झाली तर सगळा देश पक्षाघात झाल्याप्रमाणे निपचित पडेल. मुंबईत जातीय तेढ वाढली तर सारे राष्ट्र जातीयवाद्यांच्या प्रभावाखाली जाईल. काश्मीर आणि पंजाबमधील घातपात देशाच्या महत्त्वाच्या अवयवावर आघात करणारे म्हटले तर पाकिस्तानची भारताविरुद्धची मुंबई आघाडीवरील लढाई ही मर्मघात करणारी आहे. 'पाकिस्तानचा हात' ही सबब केवळ सोयीस्कर सबब म्हणून वापरली जात नसेल, तर काही किमान गांभीर्याने मुंबईचा प्रश्न सरकारने हाताळला पाहिजे.

 मुंबईतील सरकार बरखास्त करून त्या जागी केंद्राचे प्रशासन आणावे ही मागणी जबाबदार विरोधी पक्षांनी केली आहे. शत्रुराष्ट्राने एवढ्या प्रचंड प्रमाणावर कारवाई सुरू केल्यानंतर मध्यवर्ती शासनाने कारभार आपल्या हाती घ्यावा यासाठी घटनेत तरतूद आहे, एवढेच नव्हे तर केंद्र शासनाची ती जबाबदारी आहे. मुंबईत केंद्रशासन आणि लष्करी व्यवस्था तातडीने अमलात आणण्यात आली नाही तर त्याचे दोनच अर्थ निघू शकतात. एक म्हणजे 'पाकिस्तानी हात' हे निव्वळ कुभांड आहे. मुंबईतील सारे घातपात स्थानिक गुंड, तस्कर, दादाच

अन्वयार्थ - एक / ३१३