पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/311

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खून झाला? त्यामागे 'पाकिस्तानचा डाव!' 'नवऱ्याने मारले आणि पावसाने झोडपले तक्रार कुणाकडे करायची'. अशी बायकांची म्हण आहे. तसेच आले पाकिस्तानी मना! तेथे कोणाचे चालेना!!' असे म्हणून स्वस्थ बसावे, परकीय आक्रमणाच्या धास्तीने लोकांची मते आपल्यालाच पडणार या खात्रीत खुश राहावे. अशी एकूण पुढाऱ्यांची 'पॉलिसी.'
 काहीतरी करा
 शेजारी पाकिस्तानसारखे शत्रुराष्ट्र आहे. दोघांतील प्रखर विद्वेष ऐतिहासिक आहे. दोघांमध्ये गेल्या पन्नास वर्षांत तीन उघड युद्धे झाली आणि छुप्प्या लढाया सतत चालूच आहेत. तेव्हा 'पाकिस्तानचा हात' युक्तिवाद निव्वळ हास्यास्पद आहे. शेजारील शत्रुराष्ट्र जेथे शक्य आहे तेथे विरोधी कारवाया करणारच. बांगलादेश प्रकरणी भारताने हस्तक्षेप केला. तसा हस्तक्षेप करण्याची शक्यता नसली तरी इच्छा पाकिस्तानी नागरिकांत असावी हे व्यावहारिक राजकारणात गृहीत धरले पाहिजे. असल्या पाकिस्तानी हस्तक्षेपावर उपाय दोनच संभवतात :
 पहिला संरक्षक पद्धतीचा. देशातील गुप्त पोलिस यंत्रणा आणि सरहद्दीवरील पहारा इतका मजबूत ठेवायचा, की शत्रुराष्ट्राला हात सरकवण्यास वावच राहू नये. दुसरा मार्ग म्हणजे इस्त्रायल पद्धतीचा, काश्मीर, पंजाब, मुंबई जेथे कोठे पाकिस्तानचा हात दिसेल त्याला प्रत्युत्तर म्हणून आवश्यक तर पाकिस्तानी प्रदेशात जाऊन मुंहतोड अगदी 'नानी याद आयेगी' असा जबाब प्रत्येक वेळी न चुकता द्यायचा. या दोन्ही पद्धती भारत सरकारच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पुरावा मिळत नाही, सबब प्रकरण खारीज करण्यात आले आहे. असे म्हणून बहुतेक गुन्ह्यांची प्रकरणे पोलिस चौकीत निकालात निघतात. तद्वतच पाकिस्तानचा हात आहे, असा शेरा मारून घातपाताची प्रकरणे निकालात काढण्याचा सरकारी खाक्या आहे. शेअर घोटाळा प्रकरणात या जबाबदार म्हणून कोणी पाकिस्तानमध्ये नाव घेतले नाही हेच आश्चर्य! खरे म्हटले तर ते प्रकरण पाकिस्तानने घडवून आणले असल्याची शक्यता सर्वांत अधिक आहे.
 स्वस्त आणि भयानक छुपे युद्ध

 काश्मीर प्रकरणी पंतप्रधान नरसिंह राव यांनी एक शब्दयोजना केली. पाकिस्तानने आतंकवाद्यांमार्फत हिंदुस्थानशी अपरोक्ष युद्ध छेडले आहे. पंतप्रधानांनी हे शब्द वापरले. त्यांच्या लष्करी सेनानींनी त्यांना 'अपरोक्ष युद्ध' याची युद्धशास्त्रात व्याख्या काय आहे ती समजावून सांगितली असावी आणि तो शब्दप्रयोग त्यांनी

अन्वयार्थ - एक / ३१२