पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/310

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






छुपे युद्ध अधिक त्रासदायक


 रामदास नायक यांचा मुंबईत राहत्या घराजवळ भरदिवसा खून झाला आणि दंगली, कत्तली, जाळपोळ, बॉम्बस्फोट, पुढाऱ्यांचे भ्रष्टाचार या सगळ्या प्रकारांना निर्ढावलेली मुंबईची जनतासुद्धा हादरून गेली. फार वर्षांनी लोकांनी स्वयंस्फूर्तीने संपूर्ण बंद पाळला. चालत्या वाहनांवर दगडफेक झाली; पण ती सरकारी रेट्याखाली कामकाज चालू ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आगाऊ वाहनाविरुद्ध अडीचशे लोकांचे प्राण एका क्षणात घेणाऱ्या बॉम्बस्फोटाइतकीच एकट्या राम नायकाची हत्या गंभीर आहे याची सगळ्यांनाच जाणीव झाली.
 तीन व्यावसायिक मारेकऱ्यांनी अत्याधुनिक स्वयंचलित बंदुकांतून गोळ्यांचा वर्षाव करून नायकांची हत्या केली आणि ते झपाट्याने नाहीसेही झाले. पोलिसांचा पूर्वेतिहास पाहता मारेकरी सापडतील ही शक्यता जवळजवळ नगण्य. मालकिणीचा गळा कापून दागिने घेऊन पसार होणाऱ्या नोकरांना त्यांच्या गावी जाऊन अटक करणे इथपर्यंत पोलिसांच्या गुन्ह्याच्या शोधातील चतुराईची कमाल मर्यादा आहे. गेल्या काही वर्षांत डझनभर लोकप्रतिनिधींचे मुंबईत खून पडले. अजून एकाचाही निकाल पोलिस-फायलीतून बाहेर आलेला नाही.
 थोर तुझे उपकार, पाकिस्ताना!

 पाकिस्तान ही, हिंदुस्थानी राजकारण्यांच्या विलक्षण सोयीची गोष्ट आहे. पाकिस्तान तयार झाले नसते तर पाकिस्तान शोधून काढून तयार करावे लागले असते. देशात जे जे काही वाईट घडत असेल, त्याची जबाबदारी पाकिस्तानवर टाकली म्हणजे पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, राज्यगृहमंत्र्यांपासून ते गल्लीतील पुढाऱ्यांपर्यंत सगळ्यांना हात झाडून मोकळे होता येते. पंजाबमध्ये फुटीरवाद माजला? 'पाकिस्तानची कारवाई' काश्मीरमध्ये आतंकवाद्यांचेच राज्य तयार झाले? त्यामागे 'पाकिस्तानचा हात,' मुंबईत दंगे झाले, स्फोट झाले, नायकांचा

अन्वयार्थ - एक / ३११