पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/309

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 उपचार केंद्रातील रोगी, प्रयोगशाळेतील उंदीर आणि पूर्व युरोपातील नागरिक यांच्यातील समानता स्पष्ट झाली. मी त्या प्रवाशाला म्हटले, "बाबा, तू म्हणतो आहेस ते खरेही आणि आणि खोटेही. भारतात झोपडपट्ट्यात, शेतात अजून काही उद्योजक शिल्लक आहेत; पण ज्या समाजवादाने तुम्हाला अपंग बनवले, त्याने या देशातही काही थोडा धुमाकूळ घातला नाही. सरकारी संरक्षण नसेल तर आम्ही जगावे कसे, अशी तक्रार येथील बडेबडे उद्योजक करतात. आमचे उत्पादन कितीही कमी असो, आम्हाला पगार आणि बोनसवाढ मिळालीच पाहिजे अशी येथील कामगार घोषणा देतात. पाळण्यापासून ते चितेपर्यंत जागोजागी सरकारने मदत करावी अशा अपेक्षेने लोक स्वस्थ बसून राहतात. तुमच्या रोगाची लागण आमच्याकडेही झाली आहे. समाजवाद हा माणसांना पंगू करण्याचा कारखाना आहे. उत्पादन आणि उपभोग यांच्यातील संबंध तुटला म्हणजे ऐतखाऊंच्या फौजा तयार होतात. आमच्याकडेही या फौजांनी थैमान घातले आहे. समाजवादाचे विष मोठ्या जहाल प्रमाणात तुम्हाला प्यावे लागले, अनेक वर्षे प्यावे लागले. म्हणून तुमच्या देशातील कर्तबगार उद्योजक अपंग बाहुली बनले. आमचे भाग्य एवढेच, की समाजवादाचे जहर आमच्याकडे भेसळ रुपात आले."
 त्याचा अंमल दोनतीन दशकेच चालला. सरकारी क्षेत्राचा स्पर्श जेथे जेथे झाला, ज्यांना ज्यांना झाला ते अपंग झाले. सुदैवाने सरकाचा संपर्क सर्वांगांना झाला नाही किंवा चुटपुटताच झाला म्हणून आमचे अवयव थोडेफार शाबूत आहेत. माणूस चैतन्यमय आहे, धडपड्या आहे, त्याची अपंग नोकरदार बाहुली बनवणारी समाजवादी व्यवस्था मानवतेविरुद्धचा अपराध आहे. त्यातून तुम्ही सुटलात, आम्ही सुटलो; पण हातपाय पुन्हा वापरता यावेत यासाठी मोठ्या उपचारांची गरज आहे आणि निश्चयाचीही.

(२६ ऑगस्ट १९९४)
■ ■

अन्वयार्थ - एक / ३१०