पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/308

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

किरकोळ सामान तयार करणाऱ्या कौटुंबिक कारखान्याचे चित्रही तितकेच भारतीय आहे. परदेशी प्रवाशांना दिपवून गेलेली भारतीयांची उद्यमशीलता ही मोठ्या कारखान्यांची नाही, या छोट्या छोट्या उद्योजकांची आहे. मोठे कारखाने स्थापन झाले सरकारमुळे, घाट्यात गेले सरकारी थाटामुळे आणि चालू राहिले ते परदेशी स्पर्धेपासून मिळालेल्या सरकारी संरक्षणामुळे. कोणतेच सरंक्षण कोणतीही मदत नसताना अगदी आकर्षक माल लहान लहान झोपड्यात आणि शेडमध्ये तयार करणाऱ्या या बहाद्दर कारखानदारांनी देश समाजवादी अमलाच्या काळातही जिवंत ठेवला.
 परदेशी प्रवासी पुढे सांगत होता, "आम्हाला हे सारे अद्भुत वाटते. कोणतीही वस्तू तयार व्हायची तर त्यासाठी सरकारी योजना पाहिजे. कारखाना उभा राहिला पाहिजे. सामान्य नागरिकांचे काम म्हणजे दिलेल्या वेळात तेथे जाऊन ठरवून दिलेले काम यांत्रिकपणे पार पाडणे. त्यातल्या त्यात चांगला हुशार कामगार अधिक उत्पादन करायचा प्रयत्न सुरुवाती सुरुवातीला करतो आणि काही काळाने आजूबाजूचे उदाहरण आणि वातावरण पाहून, तो नाद सोडून देतो. काय उत्पादन करावे? बाजारपेठेची मागणी काय आहे? लोकांची आवडनिवड काय आहे? ती वस्तू तयार करण्याचे तंत्रज्ञान काय. आपल्याला कोणते तंत्रज्ञान फायदेशीर ठरेल. कच्चा माल कोठे मिळेल? कुशल कारागीर कोठे मिळतील? थोडीफार पतपुरवठ्याची सोय कशी होईल? सगळी यातायात करून बाजारात माल खपेल काय? उत्पादनखर्च भागेल काय? आज स्पर्धेत टिकून राहिलो; पण उद्यादेखील टिकून राहण्यासाठी आजच काय तयारी करायला पाहिजे? हे असले प्रश्न, असल्या चिंता, अनिश्चितता यांच्या कल्पनेनेही आम्ही भांबावून जातो. असले प्रश्न हाताळण्याचीच काय, विचार करण्याचीसुद्धा आमची सवय पार संपून गेली आहे."
 माणसांचे उंदीर करणारी व्यवस्था

 पूर्वी कधीकाळी प्रयोगशाळेत पाहिलेल्या साध्या पुठ्याच्या खोक्यात ठेवलेल्या पांढऱ्या उंदरांची आठवण झाली. उंदीर जात मुळात सर्वगामी; म्हणून बुद्धिदेवतेचे वाहन ठरली. कोठेही सरसर चढून जावे, कोणत्याही लहान भोकातूनही पलीकडे जावे. लीलया कोणताही अडथळा पार करावा. हा ज्यांचा स्वभावधर्म त्या उंदरांचे वंशज तीन इंच उंचीची खोक्याची कड उल्लंघून पार होऊ शकत नाहीत. कारण पिढ्यान्पिढ्या प्रयोगशाळेत वाढवल्याने त्यांची सर्व चपळता संपून गेली.

अन्वयार्थ - एक / ३०९