पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/306

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



कर्तबगारांना अपंग बनविणारा समाजवाद


 का वेगळ्या प्रकारच्या उपचार केंद्राला भेट देण्याची नुकतीच संधी मिळाली. जन्मतः विकलांग किंवा अपंग असलेल्या मुलांना थोडेफार चालतेबोलते करण्यासाठी करायच्या उपचारांचा एक विभाग, दुसऱ्या विभागात अपघाताने जायबंदी झालेल्या माणसांना पुन्हा एकदा चालतेबोलते करून शक्य तितके स्वतःचे पोट भरण्यासाठी केंद्रावर नव्याने येतात. तेव्हा मनावर अपघाताने झालेला आघात आणि भविष्याविषयीची निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. आता आपण जन्मभर अपंगच राहणार, मरेपर्यंत असेच रुटुखटू जमेल तसे जगण्याखेरीज गत्यंतर नाही. जगाच्या दयेवर दिवस कंठायचे आहेत या जाणिवेने पूरी उद्ध्वस्त झालेली माणसे उपचार केंद्रात दाखल होतात. हळूहळू एक एक हाताचा, एकेक पायाचा वापर क्षणाक्षणाने शिकत ती चालू लागतात. पहिली पावले स्वतंत्रपणे चालताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जात असतो. पुन्हा एकदा आपण आपल्या पायावर उभे आहोत. काम करत आहोत याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटत असतो.

 जन्मत:च विकलांग असलेल्या बाळांची स्थिती विशेष कठीण. चालण्याबोलण्याचा, हात वापरण्याचा त्यांना अनुभव नाही. एवढेच नव्हेतर आपण स्वतःच्या पायावर उभे राहावे अशी आकांक्षाही त्यांच्या मनात मुळी उपजलेलीच नसते. जन्मतःच दृष्टी नसलेल्याला सप्तरंगाची किमया समजून सांगण्यासारखा हा कठीण प्रकार. पक्षाघातासारख्या आजाराने हातपाय हलेनासे झालेल्या रोग्यांची परिस्थिती थोडी वेगळी. अपघातात जायबंदी झालेल्यांना अवयव नसतात; पण इच्छाशक्ती काम करत असते. पक्षाघाताच्या आजाऱ्यांच्या बाबतीत बुद्धी आणि अवयव यांच्यातील संपर्क तुटलेला असतो. विकलांग मुलांच्या बाबतीत बुद्धी आणि अवयव यांच्यातील संपर्क तुटलेला असतो.

अन्वयार्थ - एक / ३०७