पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/304

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तोपर्यंत ही 'खटिया गीते' सुसंस्कृततेचे सारे अवशेष संपविणार काय? यावर काही तातडीची उपाययोजना नाही?
 तीन पिढ्यांपूर्वी आज्यापणज्या नवीन थेरांविषयी नापसंती व्यक्त करीत होत्या. घरातल्या मुलांच्या तोंडी अभद्र गाण्याची ओळ ऐकली तर त्याला उपाशी ठेवत होत्या. आजच्या पिढीतली अगदी मुक्त मुक्त झाल्या म्हणणाऱ्या स्त्रियाही त्यांच्या आज्यापणज्यांसारख्याच वागत आहेत. घरात मुले-नातवंडे मान तुकविण्याची शक्यता नाही. तेव्हा त्या समाजावर आणि सरकारवर तुटून पडतात. 'सेन्सॉर बोर्ड' काय झोपले आहे काय? ही असली अश्लील गाणी पास होतातच कशी? अशी आरडाओरड करत आहेत.
 सरकारच्या हाती नवे कोलीत!
 सरकारने असल्या गाण्यावर बंदी घालावी, सेन्सॉर बोर्डाने अधिक कसोशीने काम करावे, अशी मागणी सगळीकडून होत आहे आणि नैतिकतेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारच्या हाती सोपवायला भलेभले तयार होऊन बसले आहेत. सरकार जितके नादान अशी मान्यता मिळत असणाऱ्या काळात नीतिमत्ता मात्र सरकार चांगल्या तऱ्हेने सांभाळू शकेल अशी भाबडी निराधार आशा लोक बाळगतात.
 गलीच्छ गाण्यांवर नियंत्रण यावे यासाठीदेखील सरकारच्या हाती सत्ता सोपवण्याला मी तयार नाही. नैतिकतेचे रक्षण करणे हे काम सरकारचे नाही. प्राणांचे, मालमत्तेचे रक्षण करणे एवढे सरकारचे काम आहे. अर्थव्यवस्थेत लुडबूड करणे हे सरकारचे काम नव्हे, तसेच नैतिकतेचे रक्षण ही जबाबदारी सरकारची नाही. बाजारपेठेने अर्थकारण ठरवावे आणि नैतिकतेचे रक्षण कुटुंब व्यवस्थेने आणि धार्मिक संस्थांनी केले पाहिजे. नैतिकत्ता हे धर्माचे क्षेत्र आहे. राजकारणाचे नाही.
 नीतिमत्ता-क्षेत्र कुटुंबाचे

 घराबाहेर पडले, की मुलांवर बाहेरच्या संगतीचे आणि समाजाचे वाईट परिणाम होणारच. सर्व समाज शुद्ध, स्वच्छ, सुसंस्कृत असेल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे होईल. एका नासक्या आंब्यानेही सारी अढी सडू शकते. कुसंगतीचे परिणाम टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती मुळात तयार करणे हे काम कुटुंब-व्यवस्था करत असे. आता कुटुंब-व्यवस्थेने फक्त मुलांची पोषण, लालनपालन करण्याची जबाबदारी तेवढी मानली आहे. कुटुंब हे संस्कार केंद्र राहिलेले नाही. ख्रिस्ती धर्माच्या देशात कुटुंबाबरोबरच चर्च आणी पाद्री संस्कारावर देखरेख ठेवण्याचे

अन्वयार्थ - एक / ३०५