पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/303

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'चीज बडी है मस्त मस्त' असल्या पाठांतरलाही वापरता येईल. आता घरात 'परवचे', 'शुभंकरोती' नियमाने क्वचितच होतात. पाठांतराची तहान आपली लहान मुले दुसऱ्या साधनांनी भागवतात. पुढे या मुलांची आकडेमोडी अडचण होईल काय? विविध प्रकारच्या शब्दांचे उच्चार करताना कसरतीअभावी त्यांची जीभ जड होऊन अडखळेल काय? स्त्रोतांचे पठण करताना नकळत होणारी नैतिकतेची अनामिक जाणीव या पिढीला होणारच नाही काय? आणि अभिजात कवितांच्या पाठांतरात वाटणारे नादमाधुर्य, कल्पनाविलास यांच्या अनुभवाने स्मिमित होण्याच्या अनुभवाला ही पिढी कायमची वंचितच राहणार काय?
 माझी नात सात वर्षांची होण्याआधी गणकयंत्राशी खेळते. येत्या वर्षा-दोन वर्षांत खिशात मावणारे गणकयंत्र घेऊन वाटेत, ती आकडेमोड आणि महाप्रचंड शब्दभांडारातून निवड ती केवळ दोन-चार कळी बोटाने दाबून मिळवू शकेल. परवचे आणि पाठांतर यांची तिला आवश्यकता वाटणार नाही. गणकयंत्र पिढीतील मुलांचे पाठांतर वेगळे असावे हे साहजिक आहे. थोडक्यात, 'अधोऽधो गंगेयम्' म्हणण्याऐवजी 'सेक्सी, सेक्सी' म्हटल्याने जो काही फरक पडतो, तो बरावाईट कसा आहे, याचा विचार इतिहासावर सोडावा हे बरे!
 जशी मागणी तसा पुरवठा

 जमाना बिघडला आहे, लोकांच्या चवी बिघडल्या आहेत. त्यामुळे चटकदार ठेक्याखेरीज काहीच नसलेली ही गाणी लोकप्रिय होतात, हा युक्तिवादही काही फारसा खरा नाही. जुन्या सिनेमातील वेचक गाण्यांचा कार्यक्रम असला म्हणजे अगदी तरुण मुले-मुलीही आग्रहाने समोर बसतात आणि 'मस्त मस्त चीज'पेक्षा 'एक लडकी को देखा' आजही जास्त लोकप्रिय होते. तेव्हा नवीन पिढीची रुची बिघडली आहे असे म्हणणे निरर्थक आहे. बाजारात मागणी ज्या मालाची आहे तो माल तयार होतो. घरात दूरदर्शन आल्यानंतरही सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी गर्दी करणाऱ्यांत शहरात नोकरीच्या निमित्ताने आलेली, पारंपरिक कुटुंबाच्या वातावरणाला आचवलेली, शहरातील नोकरीमुळे दोन पैसे हाती खेळू लागले, की मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा नव्याने अनुभव घेणारी ही तरुण मंडळी सगळ्यांत अधिक. त्यांच्या मागणीप्रमाणे हा माल तयार होतो. देशाची आर्थिक विकासाची मार्गक्रमणा अधिक नैसर्गिक आणि शास्त्रशुद्ध असती तर गुंड, तस्कर, भ्रष्टाचारी नेते तयार झाले नसते, बकाल शहर वस्त्याही झाल्या नसत्या आणि 'खटिया' गीतेही सगळीकडे वाजली नसती. हा सगळा अर्थशास्त्राचा दूरवरचा विचार आज करण्याचे कारण नाही. नवीन अर्थव्यवस्था कधी येईल, ती येवो; पण

अन्वयार्थ - एक / ३०४