पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/302

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मोठ्या आवडीने अभिजात संगीत असल्यासारखी दिवाणखान्यात ऐकली जातात."
 नातवंडांचे गायन चालूच होते, अगदी निरागसपणे. त्यांना गाण्यातील शब्दांच्या अर्थाची जाण असण्याचा काही प्रश्नच नव्हता. दोन पिढ्यांपूर्वी आम्ही 'रामरक्षा' पाठ करताना ती जितक्या निर्विकारपणे म्हणत असू तितक्याच निर्विकारपणे ही मुले 'बाब्बा' म्हणत होती.
 ढोंग संपले एवढेच
 घरात वडील माणसांसमोर, आपल्याला माहीत असली नाटकातली किंवा सिनेमातली गाणी म्हणण्यात काही चुकीचे आणि वाईट आहे, अशी लहानपणी आमची मनोमन कोठेतरी समजूत झाली होती. त्यामुळे आसपास कोणी वडील मंडळी नाहीत असे पाहिल्यावर म्हणायचे पाठांतर आणि वडीलधाऱ्यांच्या समोर म्हणायचे पाठांतर ही दोन वेगवेगळी खाती होती. आता नवीन पिढीला असला दुहेरी आणि दुटप्पीपणा करण्याची आवश्यकता वाटत नाही. आई-वडील, विशेषतः ही घाबरायची गोष्ट आहे ही कल्पनाच आमच्या पिढीबरोबर संपली.
 'चोली' आणि 'खटिया' गाणी घरात आल्याने चांगले घडले का वाईट हा प्रश्न अलाहिदा; पण नवीन काही घडते आहे असे नाही. ढोंग संपले आहे, एरवी जुन्याच नाटकाचा नवा प्रयोग चालू आहे.
 प्रत्येक पिढीत वडीलधारी मंडळी नवीन पिढीच्या अगोचर वागण्याने धक्का खातात. शतकाच्या सुरुवातीला खानदानी बैठकीच्या गाण्याऐवजी 'अँखिया मिला के' गाण्याने असाच धक्का दिला. त्यापुढच्या पिढीला 'गोरे, गोरे, ओ बाँके छोरे'चा फटका बसला. त्यानंतरच्या पिढीला 'चावी खो जाये'ने हैराण केले आणि आता 'सरकाय लो खटिया' तोच सनातन, प्रत्येक पिढीत उभा राहणारा प्रश्न पुन्हा एकदा नव्याने उभा करीत आहे.
 चांगले की वाईट?

 आठ-दहा वर्षांपर्यंत मुलांची पाठांतरक्षमता प्रचंड असते. पाठ केलेले परवचे, स्तोत्रे, कविता इत्यादी इतकी पक्की मनात ठसतात, की ती प्रक्षिप्तक्रियेचा भाग होऊन जातात. आम्ही बाळबोध घरातली मराठी शाळेत शिकलेली मुले बावन्न गुणिले सत्तावीस असली आकडेमोड सहज करतो. माँटेसरी आणि कॉन्व्हेंटमध्ये युनिफार्म आणि सफेद बूट घालून गेलेल्या मुलांना 'नऊ साते'सुद्धा सांगण्याकरिता बोटे मोडावी लागतात, याची आम्ही चेष्टा करतो. पाठांतराच्या वयात पाठांतर होणारच. कारण या अवस्थेत बुद्धीला शब्दांची आसुसलेली तहान असते. ही तहान शब्दसंपत्ती आणि अंककुशलता वाढविण्याकरिता वापरता येईल किंवा

अन्वयार्थ - एक / ३०३