पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/301

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






नैतिकता जपण्याची जबाबदारी समाजाची


 दिल्लीला माझे वडीलभाऊ राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे गेलो. घरात मुलगा, सून आणि अठरा महिन्यांची मुलगी. दोन्ही नातवंडे मोठी गोड आणि खेळकर. आम्ही मोठी माणसे बाहेर हिरवळीवर खुर्च्या टाकून गप्पा मारत बसलो होतो आणि बाजूला शेजारपाजारच्या दोन-चार मुलामुलींसकट ही नातवंडे खेळत होती. वहिनी चहा-फराळाचे आणण्याकरिता म्हणून उठल्या; आमचे बोलणे थोडावेळ थांबले आणि मुलांचे आवाज ऐकू येऊ लागले. मोठा भाऊ 'ये लडकी है क्या' हे हिंदी सिनेमातील गाजलेले गाणे मोठ्या ठेक्यात म्हणत होता आणि दीड वर्षाची चिमुरडी नात 'बाब्बा' असे म्हणून त्याला साथ देत होती. खेळाबरोबर सहजच त्यांचे हे गायन चाललेले होते.

 वहिनी परत आल्या. त्यांच्याही कानावर त्यांच्या नातवंडांचे जुगलगीतगायन आले. त्या अगदी शरमून गेल्या आणि अवघडल्या शब्दांत म्हणाल्या, "आता काय करावे हेच समजत नाही, ही छोटी छोटी मुलंसुद्धा 'सरकाय लो खटियाँ, 'चोली के पीछे' असली गाणी म्हणत असतात. आम्ही घरात त्यांच्या कानावरसुद्धा छायागीत पडू देत नाही; पण बाहेर सगळीकडे त्यांच्या कानावर हीच गाणी पडतात." मी बोललो, "काहीच नाही; पण आमच्या याच भावाचे नुकतेच लग्न झाले होते, त्या काळची आठवण झाली. भगवानचा 'अलबेला', 'झमेला' असले चित्रपट आणि त्यांतील 'नखरे बडे मोटे', 'शाम ढले खिडकी तले' ही गाणी सगळीकडे वाजत असत. माझ्यासारख्या सनातन्यांची असल्या गाण्याबद्दल नाराजी असे, आम्ही त्यावेळीही जुन्या झालेल्या सैगल आणि पंकज मलिक यांचे भक्त. 'या नवीन गाण्यांत वाईट काही नाही; हे संगीत खास आहे.' असा आग्रह आमचे वडीलबंधू त्यावेळी धरत आणि मानले पाहिजे, इतिहासाने त्यांचे म्हणणे खरे ठरवले आहे. तीस वर्षांपूर्वी अभद्र वाटणारी ती गाणी आज

अन्वयार्थ - एक / ३०२