पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/296

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



टोळीवादाला प्रतिष्ठा मिळायला नको


 दुसऱ्या महायुद्धातील जिवघेण्या यातायातींनी थकलेल्या इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, हॉलंड, पोर्तुगाल या साम्राज्यवादी देशांच्या वसाहतींचे विसर्जन झाले. अल्जेरिया, इंडोनेशियासारख्या देशात घनघोर स्वातंत्र्ययुद्धे झाली. भारतासारख्या अनेक देशांना स्वातंत्र्य देण्यात आले.
 मजूर पक्षाच्या ॲटली सरकारने भारत सोडण्याचा निर्णय घेतला; विन्स्टन चर्चिल यांचा साम्राज्याच्या विजर्सनाला विरोध होता. वसाहतीतील लोक राष्ट्रे नाहीत; त्यांना मोकळीक दिल्यास ते एकमेकांच्या उरावर बसतील. दांडग्यांच्या लठ्ठालठ्ठीत सर्वसामान्यांचे हालहाल होतील. साम्राज्याच्या छत्राखाली वसाहतीतील लोकांना माणसे बनू द्या, स्वराज्य चालविण्याची पात्रता मिळवू द्या; मग त्यांचे भविष्य ठरविता येईल. महात्मा ज्योतिबा फुले आणि विन्स्टन चर्चिल या दोघांचा दृष्टिकोन या विषयावर समान होता. शूद्रांना विद्या मिळण्याआधी इंग्रज निघून गेले तर येणारे स्वराज्य शूद्रांना मागे केरसूणी आणि गळ्यात मडके बांधण्याची सक्ती करणारे असेल. नियम मोडणाऱ्या शूद्रांची मुंडकी गुलटेकडीच्या मैदानावर चेंडूप्रमाणे उडविली जातील, हे ज्योतिबांचेही भाकीत होते.

 चर्चिल आणि ज्योतिबा या दोघांचे भाकीत त्यांनाही कल्पना आली नसेल इतक्या भयानक रीतीने जगभर खरे ठरते आहे. चाळीस-पन्नास वर्षे वसाहतींची राष्ट्रे टिकली हेच आश्चर्य आहे. साऱ्या जगाची विभागणी दोन महासंघांच्या प्रभावक्षेत्रात झाली; शीतयुद्धाच्या मेहरबानीने शस्त्रास्त्रांचा मुबलक पुरवठा होत राहिला आणि समाजवाद्यांच्या नावाखाली बेसुमार सत्ता शासनांच्या मुठीत उजळ माथ्याने एकवटण्याची शक्यता मिळाली म्हणून बहुतेक वसाहती राष्ट्र टिकली. समाजवादी साम्राज्य कोसळले;

अन्वयार्थ - एक / २९७