पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/294

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही कल्याणकारी कामे शांतताकालीन सरकारी प्रयत्नांमुळे आणि गुंतवणुकीमुळेच होतात आणि शास्त्रास्त्रांवर खर्च केल्याने मरगळतात हे काही खरे नाही. धोंडो केशव कर्व्यांपासून कितीकजण स्त्रीशिक्षणासाठी तळमळले, झिजले? पण स्त्रीशिक्षणाचा खरा प्रसार झाला तो युद्धकाळात मॅट्रिक पास झालेल्या मुलींना रेशनिंग खात्यात झटपट नोकऱ्या लागतात आणि ५० रुपयांचा पगार भडकल्या महागाईच्या दिवसांत घरी चालून येतो या आकर्षणाने.
 युद्धे झालीच नसती तर डॉक्टर मंडळी आजही मलमे, काढे लावत बसली असती. शस्त्रक्रिया आणि प्रतिजैविकी या क्षेत्रातील अनेक सारे शोध युद्धकाळातील गरजातून किंवा अवकाश संशोधनाच्या 'अव्यापारेषु व्यापारा'तून लागले. युद्धे सर्वस्व पणाला लागून लढली जातात. माणसाच्या सर्व सुप्तासुप्त ऊर्जाचा वापर प्राणपणाने होतो तो युद्धकाळात. मनुष्यविकासाच्या मान्यवर दिशातसुद्धा शांतीकालापेक्षा युद्धकालात प्रगती अधिक झपाट्याने झालेली दिसते. डॉक्टरसाहेबांनी रोगाचे निदान बरोबर केले; पण त्यांची औषधाची उपाययोजना चुकली असे वाटते. युद्धे वाईट असतात असा हजारो नीतितज्ज्ञांनी आक्रोश केला तरी लोकांना युद्धे करावीशी वाटतात त्याअर्थी त्यात काही तथ्य असले पाहिजे. शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरचा खर्च अवाढव्य आहे. हा डॉक्टरसाहेबांचा मुद्दा बरोबर आहे; पण त्यामुळे माणसाचा खरा विकास थांबतो हे खरे नाही आणि त्यावर उपाय शस्त्रनियंत्रण नाही, उलट शस्त्रांचा खुला व्यापार झाल्यास डॉक्टरसाहेबांचे ईप्सित साध्य होण्याची शक्यता अधिक आहे.
 शस्त्रास्त्रांचे उत्पादन मोठे उपयोगी

 शीतयुद्धाच्या काळात जिवघेण्या स्पर्धेमुळे शस्त्रास्त्रांचे उत्पादन वाढत होते. अर्थव्यवस्थेचे चक्र चालू राहावे, बाजारपेठेत मागणी भरपूर राहावी, रोजगार पुरेसा मिळावा याकरिता शस्त्रास्त्रांचे उत्पादन मोठे उपयोगी पडते. आज उत्पादन केले, उद्या उडवून दिले. वापरली गेली नाहीत तर शस्त्रे लगेच निरुपयोगी होतात; कारण शत्रूकडील हत्यारे अधिक आधुनिक आणि अधिक विनाशक बनतात. शीतयुद्धाच्या काळात महासत्तांच्या साठ्यातील जुनी झालेली शस्त्रे गरीब राष्ट्रांना पुष्कळशी फुकट दिली जात, रशियाच्या पाडावानंतर आता ती विकत घ्यावी लागतात; पण आजही शस्त्रांचा खुला बाजार झालेला नाही. कोणती शस्त्रे कोणत्या देशाला पुरवायची हे महासत्ताच ठरवतात. गरीब राष्ट्रांतील सत्ताधारी सुलतान ती विकत घेतात. त्यांचा उपयोग देशांच्या संरक्षणासाठी होणार नाही हे त्यांना पक्के ठाऊक असते. खरीखुरी लढाई झडली तर हा

अन्वयार्थ - एक / २९५