पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/281

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






पंतप्रधान नरसिंह राव अमेरिकेचे 'स्टेट गेस्ट'


 पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची अमेरिका भेट पार पडली. गरीब देशांच्या नेत्यांच्या आयुष्यात अमेरिकेचा दौरा म्हणजे यशाचे शिखर. अमेरिकन राष्ट्रपतींबरोबर त्यांची झालेली आमने सामने शिखर बोलणी हा पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याला सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम. भेटीत प्रत्यक्षात काय घडले असेल हे सामान्य लोकांना समजण्याचा काही मार्ग नाही. बोलणी सुरू होण्याच्या आधी, नंतर दोघा नेत्यांचे हास्यमुख चेहरे स्थिर आणि चलत कॅमेऱ्यांनी टिपले; जगभर प्रसिद्ध झाले. भेटीनंतर दोघांनीही पत्रकारांसमोर निवेदने दिली; पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. हे सगळे लोकांना पाहायला आणि ऐकायला मिळाले; पण अमेरिकन राष्ट्रपती भवनात आत गेल्यानंतर काय घडले हे पाहायला आणि ऐकायला कोणी कॅमेरा उपस्थित नव्हता. दरवाजा बंद झाल्यानंतर आत काय घडले याबद्दलचे कुतूहल कितीही प्रबळ असले तरीही ते दाबून ठेवण्याखेरीज काही गत्यंतर नाही; पण ही शिखर परिषद म्हणजे एवरेस्ट आणि खैरोबाचा डोंगर यांच्या भेटीसारखीच.
 नरसिंह राव कोणत्या पंक्तीत?

 पंतप्रधानांच्या अमेरिका भेटीचा क्रमांक दोनचा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे पंतप्रधानांचे अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर झालेले अभिभाषण. साऱ्या जगाचे, जवळजवळ सर्वच क्षेत्रात अमेरिका नेतृत्व करते. त्यामळे परदेशी अति अति महत्वाच्या व्यक्तींची तेथे रीघ लागलेली असते. निदान दर दिवसाआड कोणी ना कोणी पंतप्रधान, राष्ट्रपती भेटीसाठी तेथे जातोच. इंग्लंड, जर्मनी, जपान अशा बड्या देशांचे नेते वॉशिग्टनला जातात ते कामकाजासाठी. त्यात उभय पक्षांना स्वारस्य असल्यामुळे भेटीचे कार्यक्रम शिस्तशीर आखले जातात. अलबत्या गलबत्या देशांचे प्रमुख अमेरिकन

अन्वयार्थ - एक / २८२