पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सीता सामोरी आली आणि रामाने एखाद्या प्राकृत पुरुषालासुद्धा न शोभणारे भाषण तिला ऐकवले,
 "भद्रे, समरांगणात शत्रूला पराभूत करून मी तुला त्याच्या तावडीतून सोडवले. पुरुषार्थ दाखवून जे काही करण्यासारखे होते ते सारे मी केले. आता माझ्या अमर्षाचा अंत झाला आहे. माझ्यावर जो कलंक लागला होता त्याचे मी परिमार्जन केलं."
 "तुला हे समजले आहे, की मी हा जो युद्धाचा प्रपंच केला तसेच या मित्रांच्या पराक्रमाचे साहाय्य घेऊन युद्धात जो विजय मिळविला, ते सारे तुझ्या प्राप्तीसाठी केलेले नाही. सदाचाराचे रक्षण, सगळीकडे फैलावलेल्या अपवादाचे निवारण, तसेच आमच्या सुविख्यात वंशावर लागलेल्या कलंकाचे परिमार्जन करण्यासाठी मी हे सारे केले."
 "तुझ्या चरित्रावर संदेहाचा डाग पडला आहे, तरीही तू माझ्यासमोर आली आहेस. ज्याप्रमाणे डोळ्यांचा आजार असलेल्या रोग्याला दिव्याची ज्योत सुखवीत नाही त्याप्रमाणे आज तू मला अत्यंत अप्रिय वाटते आहेस. तेव्हा जनककुमारी. तू तुझ्या इच्छेला येईल तिकडे निघून जा; मी माझ्याकडून तुला अनुमती देतो आहे. भद्रे, या दाही दिशा तुला मोकळ्या आहेत. आता तुझ्याशी मला काहीही कर्तव्य नाही."
 "रावण तुला आपल्या खांद्यावर बसवून घेऊन गेला, त्याने तुझ्यावर दुष्टदृष्टी टाकलेली आहे. अशा अवस्थेत, महाकुलीन असा माझ्यासारखा पुरुष तुझे पुनर्ग्रहण कसे करू शकेल?"
 फाळणीच्या वेळी हजारो अपहृत स्त्रियांचा शोध लावून, त्यांना पाकिस्तानातून परत आणण्याचे मोठे कठीण काम अनेक संस्थांनी केले. दुर्दैवाची गोष्ट अशी, की त्या स्त्रियांचे आईबाप, पती, सासूसासरे त्यांना स्वीकारण्यास तयार झाले नाहीत. या अपहृत स्त्रिया कलंकित झालेल्या आहेत, त्यांना आम्ही स्वीकारू शकत नाही, असा त्यांचा युक्तिवाद होता. स्वस्त्रियांचे रक्षण करण्यास जे पुरुष असमर्थ ठरले होते त्यांनीच अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांना धुत्कारले. या सगळ्या नरवीरांचा सनातन आदर्श 'प्रभू रामचंद्र'च.
 बिभीषणापाशी रहा :
 एखाद्या अभद्र पुरुषाप्रमाणे राम सीतेला पुढे म्हणाला, "आता तू पाहिजे तिकडे जाऊ शकतेस. तू इच्छिलेस तर भरत किंवा लक्ष्मणाच्या संरक्षणाखाली सुखपूर्वक राहण्याचा विचार करू शकशील. तुझी इच्छा असेल तर शत्रुघ्न,

अन्वयार्थ – एक / २१