पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राष्ट्रवाद्यांनी केला.
 आपापल्या सामर्थ्यानुसार समाजाला द्यावे आणि गरजेपुरतेच समाजाकडून घ्यावे, असा समाजवादी आदर्श देऊन मार्क्सवाद्यांनी एक वेगळी संस्कृती तयार करण्याचा प्रयत्न केला.
 आपल्याजवळची मालमत्ता 'विश्वस्त' भावनेने जोपासावी, अशा नैतिकतेवर सर्व समाजरचना उभारण्याचे स्वप्न गांधीवाद्यांनी पाहिले.
 पण माणूस जसाच्या तसा राहिला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सारे षड्पुि त्याला जन्मतःच घेरतात आणि जन्मभर त्याचा पाठपुरावा करतात आणि माणसांचे सगळे आयुष्य दुःखमय करून टाकतात. सगळ्या उत्क्रांतीत माणसाचा मूळ स्वभाव काही बदलला नाही. त्याचे सामर्थ्य वाढत गेले आणि प्रकृती रानटीच राहिली. परिणाम असा झाला, की जंगलात फिरणारा रानवट पूर्वज एखाद दुसऱ्या माणसाचे डोके फोडी, तेथे सुधारलेला वंशज गावेच्या गावे, शहरेच्या शहरे, प्रदेशच्या प्रदेश उद्ध्वस्त करू शकत आहे. माणूस माणूस कसा बनायचा हा मोठा यक्षप्रश्न आहे.
 विज्ञानाला आव्हान
 माणसाला जे प्रश्न सुटत नाहीत ते सोडवण्याच्या कामी माणसानेच शोधलेले आणि निर्माण केलेले विज्ञान, तंत्रज्ञान येते. वाढती लोकसंख्या भुकेपोटी मेली असती; पण बियाण्यांच्या नव्या वाणांनी आणि सुधारित शेतीने वाढत्या तोंडांना पुरून उरेल इतकी धनधान्याची मुबलकता तयार केली. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती तर इतकी झपाट्याने झाली, की माणसाचे आयुष्यमान गेल्या चाळीस वर्षांत जवळजवळ दुप्पट झाले. गणकयंत्रे, दूरदर्शन, संचारव्यवस्था यांच्या अक्षरशः गगनभेदी उड्डाणामुळे माणसाच्या दैनंदिन आयुष्यात मोठा गुणात्मक फरक घडत आहे. आजपर्यंत माणसाला थोडाफार माणूस बनवले ते तंत्रज्ञानाने, माणसाने नाही ! अवतारांना, प्रषितांना, संत महात्म्यांना जे जमले नाही, राष्ट्रधुरंधर, समाजवादी यांना जे पेलले नाही, ते खुद्द माणसात गुणात्मक बदल घडवून आणण्याचे काम शास्त्रविज्ञान करील असे दिसत आहे.
  'जडा' पलीकडील विज्ञान
 नवे विज्ञान 'जड', 'चेतना' असल्या कल्पनांबद्दल प्रश्नचिन्ह उभे करीत आहे, एवढेच नव्हे, तर स्थलकालाच्या पारंपरिक कल्पना नाकारत आहे. 'क्वान्टम सिद्धांतां'नंतर पदार्थविज्ञान शास्त्रात एक मोठी क्रांती घडून आली. जडांवर प्रयोग करणारे हे शास्त्र जागोजागी जडापलीकडील अनुभव नोंदवण्याच्या

अन्वयार्थ – एक / १६