पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






नव्या शतकातील माणूस - माणूस असेल


 त्क्रांतीच्या प्रवाहात माणसाची निर्मिती झाली. माकडासारखा दिसणारा माणूस हळूहळू सरळ ताठ चालू लागला. त्याचा चेहरामोहरा बदलला. आजूबाजूच्या परिस्थितीवर मात करण्याची त्याची क्षमता वाढत गेली. साधने, अवजारे, यंत्रे संपादून तो साऱ्या पृथ्वीचा मालक बनला. धर्म, जाती, राष्ट्र, व्यावसायिक संस्था अशा विविध प्रकारच्या संघटना बनवून आपले प्रभुत्व त्याने आणखी मजबूत केले.
 पण माणसांच्या समाजात हरघडी मोठ्या जटील समस्या उभ्या राहतात. सुखासमाधानाने गुण्यागोविंदाने नांदण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करणे, लांडीलबाडी, चोरी दरवडे, खून, भ्रष्टाचार असले प्रकार माणसे करतात, एवढेच नव्हे तर संघटितरित्या आक्रमण, जाळपोळ, लुटालूट, शोषण करीत राहतात. असल्या प्रकारांना आळा घालण्याकरिता कोणा धर्ममार्तंडाला मानावे, कोणा राजा सम्राटाचे सार्वभौमत्व मानावे, कोणा पंतप्रधानाकडे, संसदेकडे सत्ता सोपवावी तर भ्रष्टाचार सत्तेला खाऊन जातो. 'सत्ता तेथे भ्रष्टाचार' या नियमाला अपवाद मोठा दुर्मिळ.
 माणूस सुधारला नाही

 या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी थोर थोर विचारवंतांनी वेगवेगळे मार्ग सुचविले.
 इहलोकातील खोट्या सुखांकडे लक्ष देण्याऐवजी इथे त्यांच्याविषयी उदासीन राहावे, 'दुःख तप्तानाम् प्राणिनाम् आर्तिनाशनम्' हे जीवित्व मानावे म्हणजे मोक्ष मिळेल, स्वर्ग मिळेल अशी लालूच हरेक धर्माने दाखवली. कुलासाठी व्यक्तीचा त्याग करावा, गावासाठी घराचा, राष्ट्रासाठी गावाचा, असा आदर्श घालून स्वतःच्या स्वार्थावर पाणी सोडण्यास माणसे तयार करावी, असा प्रयत्न

अन्वयार्थ – एक / १५