पान:अन्वयार्थ - १ (Anvayarth -1).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दाणे तयार करणारा पण तो सगळ्यात दरिद्री रहातो, सगळ्यात कर्जबाजारी रहातो आणि, प्रसंगी आत्महत्या करायलाही उद्युक्त होतो याचे कारण त्याला बाजारपेठेचे स्वातंत्र्य नाही, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाही' हा विचार मी सातत्याने वेगवेगळ्या प्रसंगी मांडला आहे. शेतीसंबंधी लिहायचे नाही असे जरी म्हटले तरी माझ्या बुद्धीतील या पार्श्वभूमीच्या आधारानेच जगात इतरत्र घडणाऱ्या घटनांचा अन्वयार्थ लावणे हे उघड आहे. अश्या तऱ्हेने देशातील तत्कालीन घटनांचा अन्वयार्थ स्वातंत्र्याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून लावण्याचा हा एक प्रयत्न आहे. शेतकरी संघटनेच्या अभ्यासकांना अलीकडे माझे प्रसिद्ध झालेले पुस्तक 'जग बदलणारी पुस्तके' याच्या बरोबर प्रचलित घटनांचा अन्वयार्थ लावणारा हा लेखसंग्रह पसंत पडावा.
 याखेरीज, 'प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' हे माझे पुस्तकही या आधीच प्रकाशित झाले आहे. शेतकरी संघटनेच्या अभ्यासकांना 'अन्वयार्थ', 'जग बदलणारी पुस्तके' आणि 'प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश' ही पुस्तके 'शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती' आणि इतर पुस्तकांच्या बरोबरीने अभ्यासाकरिता उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

शरद जोशी
८ फेब्रुवारी २०१०

दहा