Jump to content

पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केली होती), अस्वस्थ करणारा, मन विदीर्ण करणारा, भिडणारा अनुभव या कथेत आला आहे. कथेची नायिका प्रज्ञा आहे. तिची रमावहिनी रखरखत्या उन्हात प्रसववेदना सोसत आहे. तिचा तापही वाढत चालला आहे. सोजरमावशी या सुईणीने बादलीभर पाणी तिला हवे आहे असे सांगितले आहे. उन्हाच्या विखारी झळा वाढतच चालल्या आहेत. पाण्याच्या टँकरचा अजूनही पत्ता नाहीए. प्रज्ञा ही जात्याच हुशार आहे. म्हणून तर तिच्या बोलण्यामुळे निदान तिच्या वाडीपर्यंत कच्चा रस्ता तरी झालेला आहे. जातीमुळं गावकुसाबाहेरचं हे जिणं आहे. अखेर तिला टँकर दिसतो. ती रणरणत्या उन्हात पळत जाते. मात्र हब्राहिम ड्रायव्हर गेले कित्येक दिवस तिच्यावर नजर रोखून आहे. तो तिला कुस्करण्याची संधी शोधतो आहे. ती संधी त्याला आज चालून आली आहे. तिच्या अगतिकतेचा तो फायदा उठवतो. सर्वस्वी ही दहा मिनिटे घातचक्राची मिरासदारी ठरतात. अखेर ती टँकरमधून तांड्यावर येते, पाणी भरून घराकडे जाते. सोजरमावशीचा चेहरा वाचून ती तिच्या तोंडून हकिकत ऐकते. रमाचा ताप वाढून तिला वाताचे झटके येतात व ती जाते. आणि काही क्षणातच बाळही तापाने मरतो. एका प्रचंड कोलाहलाचे घनव्याकूळ दु:खद तळ आपल्यात सामावून घेणारी ही कथा आहे. प्रज्ञाचा अगतिक, असाहाय्य, आणि ममताळू कनवाळू चेहरा दाखविणारी कथा आहे. प्रज्ञा ही बुद्धीचे, कारुण्याचे रूप आहे.

॥६॥

 एकूणच श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमधील स्त्रीरूपाचा हा अल्पसा आढावा. सबंध भारतीय परंपरेतील स्त्रीचा समाजातील भूमिकेचा विशालं पट भांडणारी त्यांची कथा आहे. मनोविश्लेषणपर, पण एकाच एककाचे / अंगाचे चौफेर भान त्यांच्या कथेला आहे. चित्रदर्शी शब्दकळा व नाट्यात्मक अभिव्यक्तीने युक्त ही कथा आकस्मिक कलाटणी घेते. स्त्रीकडे पाहण्याच्या परंपरागत दृष्टिकोनाचा अव्हेर करून स्वतंत्र बाण्याच्या स्त्री व्यक्तिरेखा, स्त्रीविश्व उभे करणे हे देशमुख यांच्या कथेचे बलस्थान म्हणता येईल. अनेककेंद्री प्रगल्भ जाणिवांनी युक्त अशी ही मुक्त कथा स्त्रीरूपे रेखाटली आहेत. मांडणी स्वप्नवत भासली तरी समृद्ध अनुभवविश्व लाभले आहे.

 उदात्त आणि उन्नत, विचारशील, संस्कारशील ही स्त्री त्यांच्या कथेत आढळते. त्यांची कथा अनुभवदृष्ट्या आजच्या मराठी कथेच्या पुढे गेली आहे. श्री. देशमुख यांच्या कथेबाबत एक ठाम विधान करता येईल ते म्हणजे, आपल्या आमूलाग्र वैशिष्ट्यांनी श्री. देशमुख यांच्या कथेने मराठीचे कथादालन समृद्ध केले आहे. वेगळ्या अनुभवविश्वाची जाणीव ही मराठीत कथा विश्वाला पुढे नेणारी ठरली आहे.

१०० □ अन्वयार्थ