पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यातून ती आत्महत्येस प्रवृत्त होते परंतु त्यातून ती बचावते. तिला आईच्या शब्दाने पुनर्जन्म लाभल्यासारखे होते. एक आई मुलीचा हरवलेला आत्मविश्वास नव्याने जागृत करते म्हणून कथेचे शीर्षकही सार्थ ठरते. तर दुसरी कथा ही 'बेबी' ची आहे. ही साताऱ्याकडील गरीब घरातील युवती राष्ट्रीय धावपटू म्हणून नावाजली जाते. तिचा प्रशिक्षक मात्र दलित असतो. बेबीचे लग्न होते. तिच्या इच्छेविरुद्ध तिचा नवरा तिच्यावर बलात्कार करतो. करियरला बाधा ठरू नये म्हणून ती संबंध टाळण्याचा प्रयत्न करते पण अखेर तिला गर्भ राहतो. त्यातूनही सोनोग्राफी होते. तो भ्रूण स्त्री असल्याने बेबी तो ठेवायचा मनात धरते परंतु सासरच्या लोकांकडून गर्भपाताचा घाट घातला जातो. तेव्हा तिचे गर्भाशयही छिनले जाते. ही संबंध कृती तिच्या मनाविरुद्ध होते. तिच्या डायरीतील प्रशिक्षकासोबतचा फोटो पाहून तिच्याविषयी शंका घेतली जाते. तिचे ऑलिम्पिकचे (सिडनी) स्वप्नही अधुरेच राहते.... अन् ही गुणी खेळाडू आत्महत्या करते. जातीचा प्रश्न आणि ग्रामीण महिला खेळाडूचा चेहरामोहरा या कथेत उत्तमरीत्या प्रकटला आहे. अतर्य मानवी वर्तनाचा मानसशास्त्रीय धांडोळा हा या कथांचा पाया आहे. मूलार्धाने आगळे-वेगळे आणि शास्त्रीय स्वरूपाचे पक्के परंतु वस्तुनिष्ठ असे हे क्रीडा जगताचे लेखन आढळते. महिला खेळाडूंची ही विविध रूपे आहेत.

॥४॥

 'अग्निपथ' मधील अनुभवविश्व हे देशांतर्गत स्तरावरील जातीय दंगली, दहशतवाद, धर्मवाद व त्याअनुषंगाने येणारे प्रश्न फार प्रभावीरीत्या उभे करणारे ठरले आहे. नामोहरम झालेली माणसे पुन्हा लोकशाहीवरच्या अढळ विश्वासाने वाटचाल करतात ही मोठी निष्ठेची बाब आहे. त्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही कर्तव्य आणि तडजोड, प्रशासकीय कर्तव्य यामध्ये विवेक साधताना कराव्या लागणाऱ्या झगड्याचे चित्र आले आहे. संग्रहामधील 'काश्मीर की बेटी' या कथेमधील साराच्या धडाडीवृत्तीचा आलेख अधिकांशाने उंचावला गेला आहे. या कथेची नायिका सारा आहे. ती रणरागिणीचे रूप घेऊन उभी आहे. नादान नवऱ्यापासून आपल्या दोन्ही मुलींना घेऊन ती अलिप्त राहते आहे. एका अतिसंवेदनशील भागामध्ये राजकारणात उतरलेल्या या स्त्रीचा संघर्षमय प्रवास चित्रित केला गेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेच्या दरम्यान तिच्यावर बॉम्ब हल्ला होतो. तरीही काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या निर्णयाप्रत ती येते. पंधरा वर्षापूर्वी तिच्या निगार या बहिणीचे अपहरण अतिरेकी करतात तेव्हा गृहमंत्री असणाऱ्या अब्बूंनी देशाच्या इज्जतीपेक्षा स्वत:चा स्वार्थ साधून तिची सुटका केलेली असते.

अन्वयार्थ □ ९३