पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करता येईल. मुख्यत: या दोन्ही लेखकांनी बोलीभाषेला मारक अशा संस्कृत-प्रचुर भाषेचा संवादातही केलेला वापर संस्कृतिस्टांच्या तुलनात्मक दृष्टिकोनातून तपासावा लागेल. ही लेखकाची मर्यादा नसून कथा व कथाकार हे विशिष्ट सांस्कृतिक उपगटाची उत्पादने आहेत; याचा हा परिणाम आहे. हे नीट स्पष्ट होण्यासाठी तुलनात्मक संस्कृती अभ्यास रुजावे लागतील. ते नसल्यामुळे अज्ञानाचे उत्पादन वाढते आहे.
लेखकाचे वेगळेपण आजवर अंधारात राहिलेल्या किंवा पुरेसा न्याय न मिळालेल्या विषयांची निवड, त्यासाठी करावे लागणारे फील्डवर्क व वाचन आणि निर्भयपणे वास्तवाला भिडण्याची ताकद यातच आहे. त्यामुळेच या सर्वच कथांची वाचनीयता ढासळलेली नाही. एरवी हे या तीन विषयावरील अहवाल / प्रबंध किंवा ट्रॅक्स ठरले असते. तिन्ही संग्रह तंत्रदृष्ट्या एकापेक्षा वेगळे करण्यात त्यांना बरेचसे यश आले आहे. या मागे त्यांची नितळ सामाजिक बांधिलकी व प्रशासकात क्वचित आढळणारा पारदर्शीपणा आहेत, हे उघड आहे. एकूण मराठी कथेत त्यांचे हे वेगळेपण अबाधित राहील असे वाटते.

८६ □ अन्वयार्थ