पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तरार्धात बोकाळलेला हा मनोविश्लेषणाचा अथवा संज्ञा प्रवाहाचा अतिरेकी वापर त्यांनी मुळीच केलेला नाही. चालू शतकात ते फ्राईडप्रणीत मनोविश्लेषण व मनातील संज्ञाप्रवाह ही तंत्रेच हास्यास्पद ठरवली आहेत. मध्यमवर्गीय इंग्रजाळलेल्या साहित्याकडून ते ग्रामीण व दलित साहित्याच्या तळागाळात अनुकरणाच्या रेट्यात पोहोचले. ते नव वसाहतवादाच्या परिभाषेत किती 'बालिश' होते हे आता उघड होत आहे. देशमुख त्या त्सुनामीतून वाचले.
 विस्तारभयास्तव शीर्षक कथा "नंबर वन'चाच सविस्तर विचार करू. ती देखील 'नंबर वन' म्हणवून घेणे आणि खरोखर तसे असणे यातील अंतर अत्यंत सूक्ष्म पातळ्यांवर स्पष्ट करते. तिची पार्श्वभूमी विम्बल्डनची व पात्रे परदेशी आहेत. या कथेचे प्रथमपुरुषी एकवचनी निवेदन जर्मनीतील नंबर वन ग्रँडस्लॅम विजयी ठरलेली सुझन करते आहे. अपघातामुळे पाच वर्षे स्पर्धेबाहेर असलेली ऑस्ट्रेलियाची मोनिका पुन्हा या स्पर्धेत उतरली आहे. स्वत:च नंबर वन असल्याचा दावा तिने केला आहे. सुझनचा चाहता हरमनने जखमी केल्यामुळे तिला पाच वर्षे स्पर्धेबाहेर राहावे लागले होते. त्यामुळे आपला 'नंबर वन' खरा नाही, डागाळलेला आहे याची सुप्त जाणीव सुझनला अस्वस्थ करीत असते. तशात वेडाचे झटके येणारी तिची बहीण वेड्यांच्या इस्पितळात अतिशय हिंसक बनल्यामुळे तिला विमानाने तिकडे जावे लागते. मेरी शाळेत असताना या खेळात नंबर वन होती. एकदा भांडणात तिला सुझनने जोराचा फटका मारल्याने तिचा एक पाय मोडला होता. त्यामुळे ती कायमची या खेळातून बाद झाली. ती बहिणीचा कमालीचा द्वेष करते. मोनिकाच खरी नंबर वन म्हणून बहिणीला दूरदर्शनवर त्यांचा खेळ बघताना शिव्या घालते. अखेर सूझन मोनिकाचा पराभव करते. शेवटी ती स्वत:च म्हणते
 नाही हरमन, मी कधीच नंबर वन नव्हते. नाहीय. मला माफ कर मेरी, मला माफ कर मोनिका. तुमच्या त्या अपघाताला मी जबाबदार नव्हते गं. मला अशा त-हेनं पुढं जायचं नव्हतं. पण पण...
 मी-मी खरंच नंबर वन कधीच नव्हते. नाहीय?

(नंबर वन १६०)


 अत्यंत वाचनीय अशा या कथा मोजक्या खेळांच्या विश्वात वाचकांना गुंगवूनगुंतवून ठेवतात.

 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या संग्रहाची कुळकथा लेखकाने 'मनोगतात सविस्तर सांगितली आहे. शीर्षक, मुखपृष्ठ, प्रकाशक, लेखकाचे नाव व पत्ते, प्रकाशन वर्ष, प्रस्तावना, मनोगत, आतील चित्रे, परिशिष्टे व मलपृष्ठ या सर्व

अन्वयार्थ □ ८१