पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ब्राह्मणाला त्रास होणार असे मला विचारणारे मला पुण्यात भेटले. ते त्यांचा कोल्हापूरात नागरिकांनी बदलीनंतर आयोजित केलेला सर्वात मोठा निरोप समारंभ बघायला हवे होते. त्यांचा 'सावित्रीच्या गर्भात मेलेल्या' हा संग्रह त्याची साक्ष आहे. आयुष्यात त्यांना कोल्हापूरचाच कालखंड सर्वार्थाने श्रेष्ठ वाटतो असे ते म्हणतात. हा वाङ्मयबाह्य उल्लेख तुलनेसाठी मुद्दाम आणला आहे. कारण या कथादेखील विशिष्ट संस्कृती व पर्यावरणाची ‘उत्पादने' आहेत. एरवी जास्तीत जास्त जाती व धर्मातील पात्रे 'पाणी', 'क्रीडा' व 'स्त्रीभ्रूणहत्या' अशा आशयसूत्रांना उठाव देण्यासाठी त्यांनी निवडली नसती. एरवी विज्ञान कादंबऱ्यांचे नायक आर एस. एस.वाले ब्राह्मणच का? हा प्रश्न हॉलंडमधील चर्चासत्रात जर्मन संशोधक डॉ. डार्डरने उपस्थित केलाच नसता. सबब देशमुखांचं अनुभवविश्व अनेकतावादी आहे.
 'बंद लिफ्ट' मध्ये झोपडपट्टीतला हॅम, व्हीनस व सेरेना या अमेरिकन 'ब्लॅक डायमंड' टेनिसपटूंशी वर्णभेदाचे बळी म्हणून नातं जोडतो. त्यांचा सामना तो क्रिकेटपटू व हवाई सुंदरी निलू बघत आहेत. धर्मांतरित दलित ख्रिश्चन आणि उच्चवर्णीय यांच्यातील क्रीडांगणावरील संघर्ष देशमुखांनी अत्यंत अलिप्तपणे चित्रित केला आहे. तो इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्याइतका भारतात कुणीही स्पष्टपणे मांडलेला नाही. जात-पंथभेद भारतातील प्रत्येक क्षेत्र कसे नासवतात हे समजण्यासाठी ही कथा उल्लेखनीय आहे. साहित्यात वाङ्मयबाह्य जात व राजकारण आणू नये म्हणणाऱ्या वांझ कलावाद्यांचा मुखभंग करणारे आंतरराष्ट्रीय परिमाण तिला लाभले आहे. जॉर्ज ऑरवेल म्हणायचा की, 'साहित्यात राजकारण आणू नये म्हणणे हेच एक मोठे राजकारण आहे.' देशमुखांनी हे शिवधनुष्य शासकीय हुजरेगिरीत कसे काय पेलले याचेच अनेकांना आश्चर्य वाटते. पुराणे व बखरींचे आधुनिकीकरण करीत लोकप्रिय ब्लॅक (मनीड्) लिटरेचर निर्माण करणारे शासकीय अधिकारी पैशाला पासरी मिळतील. कारण त्यात व्यवस्थेला सुरुंग लावणारी स्फोटके मुळीच नसतात. २० पेक्षा कमी बुद्ध्यंक असणाऱ्या समाजात अशा सुलभ व गुळगुळीत साहित्यकृती लोकप्रिय होतात असा सिद्धान्तच आहे. या पार्श्वभूमीवर देशमुखांच्या कथांतील वेगळेपण लक्षणीय आहे.
 देशमुखांनी कितीही निरनिराळे रंग फासले तरी ही कथा क्रिकेटर अनिल कुंबळेवर आहे, हे जाणकार वाचकाच्या लक्षात पुढील ओळीवरून येते :
 'मी - मी भरकटत गेलो. यशाची धुंदी मला फार लवकर चढली - आणि चित्रविचित्र चाळे, भडक रंगीबेरंगी ड्रेसेस घालणं, कानात भिकबाळी घाल कधी, तर कधी चमन गोटा कर, रात्र रात्र डिस्कोमध्ये घालव...' (बंद

अन्वयार्थ □ ७९