पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्माच्या संदर्भात पात्रांचे चित्रण करतात तेव्हा त्यांची ओढाताण लपत नाही. भारतीय लेखकाची खरी कसोटी इथेच लागते. तुलनात्मक संस्कृती अभ्यासाचा मराठीला गंधच नसल्याने हे विवेचन लेखकावर अन्याय करणारे ठरेल. ते तेव्हा सैद्धांतिक आधारावर केले जातील तेव्हा नवे आय. ए. एस. कलेक्टर “पुन्हा ते बिहारी खत्री जातीचे", वीरचक्रवाला महादू कांबळे, आर. एस. एस. भिडे गुरुजी, कलेक्टर भावे वगैरेंच्या पात्र चित्रणांचे रंग अधिक स्पष्ट होतील.
 जिल्ह्याच्या प्रमुख पदासाठीच्या 'हॉट सीट' वरील प्रशासक भिन्न जातीधर्माशी संबंधित अनुभव पात्रे एखाद्या कथासूत्रात बांधतो तेव्हा त्याच्या 'इथिक्स' चीच परीक्षा होत असते. सामाजिक व धार्मिक चळवळीत बेडूकउड्या मारणारा लेखक एकांगी चित्रणाच्या चक्रव्यूहात सहज फसतो. देशमुख मात्र जोसेफ कॉनरॅड म्हणतो त्याप्रमाणे 'दाखवणे', 'ऐकवणे' आणि 'भावनेला जाणवून देणे' हे तिहेरी हेतू कथेत साध्य करतात. खरे तर 'पाणी' हे आशयसूत्र ‘अमिना' मध्ये फार दुबळे आहे. फक्त रोजगार हमीचे काम हा एकच दुबळा अदृश्य धागा उल्लेखात जाणवतो. उलट 'दास्ताँ ए - अलनूर कंपनी' ही कत्तलखान्यावरची कथा जनावरांच्या छावण्या आणि पाणी दुष्काळ या बळकट सूत्रामुळे फार उठावदार झाली आहे. मुसलमानविरोधी वाटणार नाही एवढे हे धगधगत्या वास्तवाचे चित्रण प्रत्ययकारी आहे. एरवी ‘मुसलमानविरोधी प्रचार' हे शस्त्र आहेच.
 गावठी तिढे आणि अडाण्यांचे कोडे शहाण्याला पिडे असेच असतात. त्यांची पुरेशी समज नसेल तर ग्रामीण, दलित, आदिवासी, बामणी वगैरे नवजातवादी कथा व त्यांचा वाचकवर्ग सहज अलग काढता येतात. शेती न करणारे व्यापारी व (ब्राह्मण) नोकरवर्ग कर नसल्यामुळे शेतीकडे वळलेले दिसतात. अलीकडे नटनट्यांनी व राजकारण्यांनी खरेदी केलेल्या शेतीची अनेक प्रकरणे माजली आहेत. 'मृगजळ' या कथेत चंपकशेठजी स्थानिक लोकांची शेती खरेदी करून त्यांनाच मजूर बनवतो. भय्याला हाताशी धरून ओढ्यात विहीर काढतो. दुष्काळात ती विहीर शासनाला ताब्यात घ्यायला कोर्टातून स्टे आणतो. पण अखेर भय्याचे वडील गावकऱ्यांना चंपकशेठच्या बदफैली मुलाला वठणीवर आणायचा गुरुमंत्र देतात. संपूर्ण शेती उद्ध्वस्त होते आणि भय्या जि. प. निवडणुकीच्या तयारीला लागतो. भ्रष्टाचाराचे या कथेतील संदर्भही फार बोलके आहेत.

  'भूकबळी' मधील 'मी' डेप्युटी कलेक्टर, 'हमी कसली हमी?' मधील 'मी' आणि 'दौरा'मधील वार्ताहर प्रदीप यांचे गुणधर्म बरेच जुळतात. देशमुख पात्रे व प्रसंगांना 'बोलू' देण्याऐवजी लेखकाच्या 'आवाजा'तील भाष्ये जास्त प्रमाणात करताना दिसतात.

अन्वयार्थ □ ७५