पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 B ‘भारतात दलितांना पराक्रमापेक्षा नियतीवरच जास्त भरवसा ठेवावा लागतो.'
 B नाही दोस्त, इंडियात जात हे असं सत्य आहे की, सवर्ण ते नाही असं समजून दडपायचा प्रयत्न करतात. पददलितांना पदोपदी त्याचा सामना करावा लागतो."
 B ‘एक तर मी तसा काळा आहे, पुन्हा दलित. धिस इज जस्ट डिस्गस्टिंग, कॉम्बिनेशन, वुइच कॅन रुईन एनीबडी'
 या कथेत लेखकानं कर्ण आणि कृष्ण या पुराण प्रतिमांचा प्रतीकात्मक वापर चांगला साधला आहे.
 या कथेत दलितांच्या संदर्भात केली गेलेली सगळी विधानं सत्य असून ती जीवनानुभवातून आली आहेत. शेवटच्या विधानातील अनुभव दाहक असून वर्णव्यवस्थेच्या अमानुषतेची साक्ष देणार आहे.
 'नंबर वन' ही देशमुखांच्या उत्कृष्ट कथांपैकी एक आहे. गुंतागुंतीच्या घटना, पात्रांचे परस्परसंबंध, क्रीडा क्षेत्रातील बारीकसारीक तपशील, महत्त्वाचे संदर्भ, पात्रांच्या वैशिष्ट्यांमुळे आलेली सजीवता इ.मुळे आपण विम्बलडनच्या भूमीवर वावरत असल्याचा अनुभव येतो. पात्रांचे स्वाभाविक संवाद व निवेदनाची भाषा इंग्रजीच्या अपरिहार्य वापरांमुळे कथेला भरीव रूप प्राप्त झाले आहे. द्वेष-जन्य कृष्णकृत्याशिवाय मिळालेले यशच सच्च्या खेळाडूला खरे समाधान देऊ शकते, हा संदेश ही कथा लाऊड आवाजात देते.
 लक्ष्मीकांत देशमुखांच्या एकूण लेखनाचा स्थूलमानाने विचार केला, तर त्यांचे लेखन आजच्या वर्तमानाशी संबंधित आहे असे दिसते. भ्रष्टाचार, जातीयता व मूलतत्त्ववाद यावर ते सातत्याने प्रहार करीत आलेले, खऱ्या अर्थानं जागरूक समकालीन लेखक आहेत अशी माझी धारणा आहे. त्यांचे लेखन आशयकेंद्री असून अभिव्यक्ती सहज, सरळ पारदर्शी आहे. लेखन मुद्दाम रंजक - आकर्षक करणे हे त्यांच्या प्रकृतीत नाही. रूपवादापासून ते कोसों दूर आहेत. निर्भय परखडता हेच त्यांच्या लेखनाचे रूप आहे.
 देशमुख हे विज्ञाननिष्ठ इहवादी लेखक आहेत. त्यांचा सगळा भर अनुभवावर आहे. कल्पकतेचा वापर, अत्यल्प संरचनेचे अंग म्हणून झाला असेल. त्यांच्या लेखनात प्रामुख्याने प्रमाण भाषेचा वापर झाला आहे. आवश्यक तेथे ग्रामीण बोली, उर्दू, इंग्रजी इ. भाषा त्यांच्या लेखनात अवतरतात. प्रतिपाद्य विषयाला पुष्टी देण्यासाठी सिनेमाची गाणी, कविता व संतवाचनांचा क्वचित वापर करतात.

अन्वयार्थ ६९