पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विरुद्धचा आपला प्रखर रोष लेखकाने या कथेत प्रकट केला आहे. या कथेचे नाते 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या कादंबरीच्या आशयद्रव्याशी जुळणारे आहे. विषयानुरूप कथेत आलेला तपशील पाहता त्यातून लेखकाचा खोलवर झालेला अभ्यास प्रकट होतो. लतीफ आणि बिल्किसबी ही दोन्ही पात्रं हुकूमशहाविरुद्ध कृती आणि उक्तीतून आग ओकणारी आहेत. बिल्किसबीचे बंदुकीने हुकूमशाहाची तस्बीर फोडणे, भर चौकात त्या तस्बीरीवर 'तू गद्दार है' म्हणत नाचणे हा या कथेचा परमोच्च बिंदू आहे. याची दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. लेखक लतीफच्या तोंडून उद्गारतो, 'युलामीत धन्यता मानणाऱ्या हिजड्यांची एकनिष्ठ फौज' निर्माण करण्यात त्यानं यश मिळवलेलं आहे.
 जनता चेतना हरवून बसते तेव्हा हेच घडत असतं. आमच्या इतिहासाची कित्येक शतकं अशाच एकनिष्ठ गुलामगिरीनं ओतप्रोत भरलेली आहेत.
 'भवशून्य नादे' मध्ये जी इहवादी परखड चर्चा लेखकाने घडवली आहे ती 'सारांश'मध्ये अधिक स्पष्ट व्यापक व गहिरी होताना दिसते. खरं तर हा चिंतनगर्भ विषय कथेच्या अवकाशात मावणारा नाही. परंतु देशमुखांनी अंकुरण व त्या विषयाचा प्रारंभ केला आहे. देवधर्म, सैतान आणि सतत आंदोलत राहणारा दुःखी माणूस, असा त्रिकोण या कथेचा गाभा आहे.
 मेरी ही पोथीनिष्ठ धर्मपरायण प्रवृत्तीचं प्रतीक आहे. आपल्यासारखंच पवित्र जीवन आपल्या मुलानं जगावं असं तिला मनोमन वाटतं. तिचा मुलगा तिच्या नवऱ्याप्रमाणं भौतिक जगात आपलं अंतिम शोधणारा व जीवनातले सगळे सुंदर, असुंदर व क्रूर विकार जगू पाहणारा आहे. व्हॅटिकन सिटीतील चर्चमधील कोंडलेले कृत्रिम पावित्र्य त्यानं केव्हाच झुगारलेलं आहे. बापाने सांगितलेल्या, “बेटा, जग किती अनोखं सुंदर व समृद्ध आहे. हे सर्वांगानं अनुभवणं हीच खरी जिंदगी आहे." या वाक्यातच त्याला जीवनाचं सारतत्त्व सापडलं आहे. तो स्वत: लेखक आहे. परंतु त्याच्यावर व त्याच्या लेखनावर धर्म-मार्तंडांकडून बहिष्कार टाकला जातो. इस्लामच्या खिलाफ 'सॅटनिक व्हर्सेस' लिहिणाऱ्या सलमान रश्दीचं लेखन-स्वातंत्र्य इंग्लंड मान्य करतं. परंतु, ख्रिश्चन धर्माविरुद्धचं लेखनस्वातंत्र्य इंग्लंड मान्य करीत नाही. ही विसंगती देशमुखांनी खुबीनं नोंदवली आहे. लेखक स्वत:ला प्रेषितापेक्षा श्रेष्ठ मानतो. कारण तो शब्दसृष्टीचा निर्माता आहे. अशा शब्दसृष्टीचा अभिमान ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात मोठ्या गौरवाने (जी मजलागा स्वामी, दुजी सृष्टी केली तुम्ही, ती पाहोन हासो आम्ही, विश्वामित्राते.) नोंदवला आहे. भौतिक दृष्टिकोनातून धर्मचिकित्सा करणाऱ्या डी. एच. लॉरेन्सच्या 'लेडी चॅटरलीज लव्हर' या पुस्तकावरही बरीच वर्षे इंग्लंडमध्ये बॅन होता. असो, देशमुखांच्या एकूण लेखनातील

अन्वयार्थ । ६७