पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बेजबाबदार वर्तन यामुळे दलित मजूर ठकुबाईचा अन्नाविणा झालेला मृत्यू (भूकबळी).
 दलितांची दु:खं मांडायची ती दलितांनीच! काही क्षीण अपवाद वगळता अदलित लेखकांना हे आपलं दायित्व आहे असं वाटत नाही. देशमुखांनी मात्र प्रारंभापासूनच दलितांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घेणारं लेखन केलं आहे, आणि हे त्यांच्या सजगतेचं द्योतक आहे असं मी मानतो.
 खेडे भागात दलितांची परिस्थिती बिकट आहे. कमीअधिक प्रमाणात त्यांचं दमन अजून चालू आहे. उदा. दलितांना आपल्या वस्तीत जाण्यासाठी असलेली वाट कुंपण घालून अडवणारा चंपकसेठ, पाण्यासाठी मळ्यात आली म्हणून रखमाशी लगट करणारा दलपत, अॅड. भीमराव सपकाळची परिणामशून्य तक्रार; आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपले अतिक्रमण कायम राखणारा चंपकसेठ (मृगजळ); गावात पाणी न मिळाल्यामुळे अधूदृष्टीच्या वृद्ध बायजाचा विहिरीत पडून झालेला करुण अंत (कंडम); सरपंचाच्या द्वेषाचा बळी ठरलेला, महार रेजिमेंटचा वीरचक्रधारक रिटायर्ड लान्सनाईक महादू (लढवय्या); बहिष्कृत दलित तांड्यावर दिवस भरलेली वेदनाव्याकूळ रमा; गावात पाटलाने आधीच पाणी भरण्यास मना केलेली, बहिष्कृत म्हणून बैलगाडी मिळत नाही, तांड्यावर पाण्याचा थेंब नाहा, वेळेवर टँकर नाही; बेजार रमा शेवटी पाण्याअभावी ताप चढून मरते. नंतर बाळही जाते. पाण्यासाठी जीव तोडणाऱ्या प्रज्ञाचे (रमाची नणंद) सगळे श्रम वाया जातात. अशा दयनीय अवस्थेत टँकरचा ड्रायव्हर - इब्राहीम तिच्याशी हिडीस चाळे करीत असतो. केवळ पाण्यासाठी भाभीचा जीव वाचेल म्हणून प्रज्ञा सगळं सहन करते, परंतु कशाचा उपयोग होत नाही (उदक). या कथेतील इब्राहीमचं पात्र दलितांच्या संदर्भात प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. या पात्राच्या योजनेमागे देशमुखांचं सूक्ष्म निरीक्षण व दलितांविषयीची आत्मीयता सूचित होते. 'कंडम' या कथेत सईदाचा नवरा म्हणतो, “क्या बोली? येडी हो गयी क्या तू सईदा? वो म्हार - मांगो की बावडो है. वहा कैसे पाणी भरेंगे?" देशमखांनी सामाजिकदृष्ट्या वरील महत्त्वाच्या संवादातून अंतर्मुख करणारे बरेच काही सुचवले आहे. एकतर इस्लाममध्ये अस्पृश्यता नाही. वरील संवादात आढळणारा परिणाम हिंदू संसर्गाचा आहे. दुसरी गोष्ट, धर्मांतर करून मुसलमान झालेले पूर्वाश्रमीचे अस्पृश्य सार्वजनिक विहिरीवर पाणी भरून शकतात. परंतु स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा अस्पृश्य विहिरीवर पाणी भरू शकत नाही. हिंदूच्या ह्या आत्मविघातक प्रवृत्तीवर देशमुखांनी नेमके बोट ठेवले आहे. इथं मुलाण्याचा किंवा इब्राहीमचा काहीच दोष नाही. वर्णव्यवस्थेने केलेल्या माणसाच्या पशुतुल्य अवस्थेचा हा अनुषंगिक परिणाम आहे. देशमुखांची ही मूलग्राही दृष्टी खऱ्या अर्थानं रामानुज, बसवेश्वर, कबीर, फुले, बाबासाहेब, आंबेडकरांच्या जवळ जाणारी आहे. 'अमीना' ही कथा कुटुंबनियोजनाशी

अन्वयार्थ । ६३