पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखनातील समकालीनता



________________________________________________
भ. मा. परसावळे


 लक्ष्मीकांत देशमुख हे कथा-कादंबरी या वाङ्मयप्रकारात लेखन करणारे साहित्यिक म्हणून महाराष्ट्रात ओळखले जातात. त्यांच्या लेखनाचा सारभूत विचार केला तर, आपल्या काळाचे संपूर्ण भान असणारा व मानवी मूल्यांसाठी प्रसंगी जोखीम पत्करून संघर्ष करणारा लेखक म्हणून त्यांची प्रतिमा मनात प्रतिबिंबित होते. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही' या दृढ निश्चयाने ते लिहितात. भय आणि तत्त्वांशी तडजोड या गोष्टी त्यांना माहीत नाहीत. आणि म्हणूनच त्यांचे जगणे आणि लेखन यात फरक जाणवत नाही. त्यांच्या लेखनाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सांप्रतच्या कोणत्याही साहित्यप्रवाहाच्या शिक्क्यापासून व गटा-तटापासून ते पूर्णत: मुक्त आहे.
 'पाणी! पाणी!' हा त्यांचा कथासंग्रह खेड्यापाड्यातील निम्नस्तरीय माणसांच्या अडीअडचणी व पाण्याच्या समस्येशी निगडित आहे. या संग्रहात देशमुखांनी सभोवतालचं उघडंनागडं ग्रामीण वास्तव साध्या, सरळ, अनलंकृत भाषेत, कलात्मक आढेवेढे न घेता मांडलं आहे.
लोक प्रतिनिधी, कर्मचारी, अधिकारी यांच्या कुकर्मामुळं चांगल्या योजनांची वाट लागते आणि, नाइलाजानं वर्षानुवर्षे लोकांना नारूचे जंतू असलेले पाणी प्यावे लागते (नारूवाडी); हक्काच्या पाण्याचे हप्ते परस्पर धनिक पुढाऱ्यांनी लाटल्यामुळे पाण्याअभावी सगळ्या घरादाराच्या अहोरात्र कष्टाची माती झालेला हैराण महादू (पाणी - चोर) - भ्रष्ट व्यवस्थेच्या भीषण परिणतीची ही चित्रं मन हेलावून टाकतात.
 लोकतंत्र, धर्मनिरपेक्षता व समाजवादाचा अंगीकार करून साठ वर्षे उलटून गेली, तरी सामाजिक आणि आर्थिक समता आपल्या स्थापित करता आलेली नाही. सामाजिक विषमतेच्या दृष्टीने सरकार आणि शासन पुरेसं गंभीर दिसत नाही. त्यामुळे अस्पृश्यतेची समस्या अजूनही शिल्लक आहे.
 मुकादम व सरकारी यंत्रणेचा हलगर्जीपणा आणि स्वस्त धान्य दुकानदार शर्माचे

६२ अन्वयार्थ