पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अग्नेसकडून मिळते. तर 'कमल' एक वर्षाची असताना अनाथालयातून स्वीकारली गेली होती हे सत्य नवरा असणाऱ्या देसायाला कळते. तेव्हा जात, रक्त असे प्रश्न उपस्थित करून तिला उद्ध्वस्त करतो. जणू कमलचे बालपणच अनौरस असल्याप्रमाणे. 'बच्चू' ही कथा मातेने टाकून दिलेल्या अनाथ मुलांची. 'सर्वात कठीण काम' ही कथा दंगलीत मुलांना ठार करण्याचे कठीण काम सांगते, तर 'नशिबाचा खेळ' मतिमंद विकलांग नवऱ्यापासून झालेल्या तशाच बाळाला भविष्यातील घृणास्पद गोष्टीपासून मुक्त करण्यासाठी मारून टाकते. या कथांमधून कथाकाराचा हळवेपणा स्पष्ट होतो आणि ही एक मोठी सामाजिक समस्या आहे, हे ते कथेमधून सांगतात.
 'कश्मीर की बेटी' व 'गद्दार' या राष्ट्राभिमान व जाज्ज्वल्य देशप्रेम व्यक्त करणाऱ्या कथा आहेत. माझ्या पिढीतील दोन घटना स्पष्ट आठवायला हरकत नाही. नव्वदीच्या दशकामध्ये तत्कालीन गृहमंत्री मुक्ती मुहमद सैद यांच्या मुलीचे अपहरण नाट्य. बदल्यात सोडलेले.अतिरेकी आणि त्यानंतरच्या आठ - एक वर्षांनी कंदहार विमान अपहरण (डिसेंबर १९९९) व स्वतः संरक्षणमंत्र्यांनी आय.एस.आय.च्या कट्टर अतिरेक्यांची कंदहारला विमानात नेऊन केलेली सुटका.
 त्या पार्श्वभूमीची ‘कश्मीर की बेटी' ही कथा देशाभिमान जाज्ज्वल्य करणारी आहे. डॉक्टरकी करणाऱ्या लेकीचे अतिरेक्यांनी केलेले अपहरण आणि अपत्यप्रेमापायी शरण आलेले तिचे गृहमंत्री वडील यांच्यावरील कथा आहे. जिचे अपहरण झाले होते ती राजकारणापासून लांब होते. तिची धाकटी बहीण (निकाह) राजकारण हा वडिलांचा वसा घेते; परंतु धाडसी, निर्णय घेण्यात चपळ आणि पंधरा-सोळा वर्षांपूर्वी वडिलांनी चूक केली होती, हे स्पष्ट करून राजकारण करणारी ही निडर, बेडर मुलगी आहे. वडिलांच्या पक्षातून वडिलांसह बाहेर पडून नवीन पक्षाची स्थापना करून त्याची धुरा सांभाळते आणि हौतात्म्याचीसुद्धा तयारी ठेवते.
 हल्ल्यातून 'बाल बाल बचावते. अतिरेक्यांना धडा शिकवत, युद्ध करून; पण त्यांच्या वैचारिक व मानसिक मनपरिवर्तनाला प्राधान्य द्यावे असे सांगते. शेजारील राष्ट्रधर्मबांधवांचे संरक्षण म्हणून थयथयाट करते; पण मुहाजिरांच्या कत्तली आपल्याच देशात करते. हे मुहाजीर कोण आहेत? १४ ऑगस्ट १९४७ (पाकिस्तान स्वातंत्र्य दिन) व १५ ऑगस्ट १९४७ (भारताचा स्वातंत्र्य दिन) वा दोन दिवसांनंतर पाकिस्तानात गेलेले मुसलमान! त्यांची हत्या चालूच आहे.
 तो प्रश्न सोडविणे सोडून कश्मीरचे स्वप्न पाहिले जात आहे. यावर ‘कश्मीर की बेटी' आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी मांडण्याचा प्रयत्न करते. 'गद्दार' मध्ये हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या देशप्रेमीची हत्या केली जाते आणि त्यांचा मुलगा टॉर्चरिंगला भिऊन बापाविरुद्ध वृत्तपत्रातून लिहितो. बापाच्या मृतदेहाला लाथ मारून थुकतो.

४६ अन्वयार्थ