पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 खूप काही सांगता येईल, पण विस्तारभय व स्वस्तुतीचा संकोच म्हणून फार तपशिलात न जाता एवढंच सांगेन की, नोकरशाहीला अनेक अधिकार असतात व चांगल्या अधिकाऱ्यांना लोक साथ देतात. हे त्यांचं सामर्थ्य असतं. त्याचा वापर करून अनेक लोककल्याणकारी कामं व उपक्रम राबवता येतात. मी माझ्या प्रत्येक पोस्टिंगच्या पदी असं काही ना काही केलं आहे. त्यामुळे माझी जशी दक्ष प्रशासक म्हणून ख्याती आहे, तसाच एक उपक्रमशील अधिकारी म्हणूनही लौकिक आहे. त्यामुळे मी माझी प्रशासकीय सेवा छानपैकी एंजॉय केली आणि यशस्वी पण...
परसावळे -
 फारच छान. यापैकी अनेक कामे मी पाहिली व अनुभवली आहेत. असो. आता पुन्हा साहित्याकडे वळू या. आपल्या लेखनास मिळालेले मान-सन्मान, पुरस्कार व प्रशंसक याबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल?
देशमुख -
 मला आजवर राज्य शासनाचे तीन पुरस्कार दोन कथासंग्रहासाठी ('अंतरीच्या गूढ गी' व 'पाणी! पाणी!!') व एक कादंबरी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' साठी मिळाले आहेत. या खेरीज म. सा. प. पुणे व औरंगााबदचे प्रत्येकी दोन व इतर वाङ्मयीन संस्थेचे डझनभर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पण विजय तेंडुलकरांनी त्यांच्या आवडत्या ५० पुस्तकात माझ्या 'अंधेरनगरी' चा समावेश करणे, म. द. हातकणंगलेकरांनी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ची तुलना टॉलस्टाय व डोस्टोवस्कीशी करणे; चंद्रकांत बांदेवडकरांनी माझ्या 'अंधेरनगरी' व 'इन्किलाब' वाचून उत्तेजित होऊन उस्फूर्त प्रतिक्रिया देणं हे मला पुरस्कारापेक्षाही मोलाचे वाटतात. वाचकांच्या प्रतिक्रिया या बहुतांश प्रशंसेच्या राहिल्या आहेत. माझ्या एकाही पुस्तकाचं परीक्षण करताना एकादी समीक्षकानं झोडपलं नाही, उलट बहतेक समीक्षा ही प्रशंसा व लेखनातील वेगळेपणा बाबतची व ती मौलिक होती, या आशयाची होती.
परसावळे -
 भविष्यातील प्रकल्प?
देशमुख -

 अनेक आहेत. यावर्षी दोन ललित पुस्तके प्रकाशित होत आहेत. तसेच उदगीर येथील नियोजित साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निवडक लक्ष्मीकांत देशमुख' व माझ्या साहित्यावरील समीक्षा अशी दोन पुस्तके, ज्यांचे संपादन डॉ. रणधीर शिंदे करीत आहेत, जी प्रकाशित होत आहेत. तसेच दोन कादबंऱ्यांचे सध्या लेखन चालू

अन्वयार्थ □ ३६१