पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/359

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महत्त्व आहे हे शहरी माणसांना कळणार नाही. पण हेही मला करता आलं ते माझ्या 'आऊट ऑफ बॉक्स' उत्तरे शोधण्याच्या प्रतिभेमुळे.
 सांगली जिल्हा परिषदेमध्ये असताना सुमारे ४५० शाळांना प्रत्येकी तीन संगणक आणि इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या वर्गाच्या सर्व डीव्हीडीज देऊन आणि शिक्षकांना त्यांचं प्रशिक्षण देऊन शैक्षणिक गुणवत्तावाढीचा अभिनव कार्यक्रम राबवला. माझी आजही भावना व विश्वास आहे की, ई-लर्निंग ही काळजी गरज आहे व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक बाब आहे. मी हे २००५ मध्ये केलं. आज अनेक ठिकाणी त्याचं अनुकरण होत आहे.
 १९९३-९४मध्ये परभणीला मी समन्वयक म्हणून संपूर्ण साक्षरता अभियान राबवून सुमारे सव्वादोन लाख प्रौढ निरक्षर स्त्री - पुरुषांना साक्षर केले व १९९१ च्या जनगणनेत जो जिल्हा खालून दुसरा होता, तो २००१ च्या जनगणनेनुसार स्त्री साक्षरतेमध्ये राष्ट्रीय सरासरीपर्यंत पोचला गेला. हेही माझ्या हातून महत्त्वाचं काम झालं असं मी मानतो. त्यासाठी वर्षभर दररोज सायंकाळी बाहेर पडून मध्यरात्रीपर्यंत साक्षरता वर्गांना भेटी देणे व कार्यालयीन वेळात नियोजन, बैठका व अंमलबजावणीचा आढावा घेणे असं मी स्वत:ला या कामात एका ध्येयानं झपाटून जात झोकून दिलं होतं. त्यामुळे हे अभियान यशस्वी झालं. 'निशाणी डावा अंगठा' कादंबरी व सिनेमामध्ये व्यंग शैलीत त्यातील गैरप्रकार दाखवले. अनेक ठिकाणी तसे प्रकार वास्तवात घडले होते हे मी नाकारत नाही. पण माझ्या परभणी जिल्ह्यात साक्षरतेची आकडेवरी वस्तुनिष्ठ होती, हे कर्वे सामाजिक संस्थेनं १५० गावातील साक्षरता केंद्रांना भेटी देऊन जो अहवाल दिला त्यावरून सप्रमाण सिद्ध होतं. येथे माझा ध्येयवाद व झपाटलेपणा हे गुण माझ्या कामी आले.

 परभणीला १९९६ साली मी सहकाऱ्यांच्या मदतीने ६८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतले, ते अत्यंत नेटके व अनेक नवे पायंडे पाडणारं होतं. तसे उपक्रम नंतरही फारसे राबविले गेले नाहीत. पण ते जाऊ दे. कोल्हापूरला मी शाहू भवन स्मारकाचे नृतनीकरण व विस्तारीकरण करून त्याचे नाटक, सिनेमा, चित्रशिल्प, परिसंवाद व पुस्तकांच्या एक सांस्कृतिक केंद्रात रूपांतर केलं, त्याचं मला अपार समाधान आहे. कलेक्टर म्हणून कोल्हापूरच्या बाल कल्याण व रिमांड होमचा मी पदसिद्ध अध्यक्ष होतो. तेथे वाढल्या संख्येने येणाऱ्या अनाथ मुलांना सामावून घेण्यासाठी व त्यांना उत्तम निवास सुविधा देण्यासाठी लोकवर्गणीद्वारे दोन कोटी रुपयांच्या इमारती (तीन तीन मजल्यांच्या) बांधून ६०० बालकांच्या निवासाची सोय केली. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याइतकचं महत्त्वाचं असं हे काम माझ्या हातून घडलं याचं मनस्वी समाधान वाटतं.

३६० □ अन्वयार्थ