पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/358

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशमुख -
 माझ्यासाठी माझं लोखन जेवढं व जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच व तितकंच प्रशासनही. मी स्वेच्छेने बँकेतील अधिकारी-पदाची आरामाची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेच्या धकाधकीत आलो. त्यामागे प्राप्त अधिकार व पदाच्या माध्यमातून काही चांगले काम करण्याचा एक (अनेकांना भाबडा व आऊटडेटेड वाटणारा) ध्येयवाद होता. माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत मला प्रत्येक ठिकाणी जनतेला न्याय व दिलासा देता आला, काही चाकोरी बाहेरची काम करता आली, तसेच पदाचा वापर करून काही भरीव सांस्कृतिक व शैक्षणिक कामही करता आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेत मी माझ्या स्वत:च्या वेगळा असा ठसा उमटवला आहे असे मला वाटते!
 मी केलेली काही मोजकीच कामे मी सांगेन. मी मेल्यानंतरही ज्या कामासाठी कदाचित काही काळ आठवला जाईल ते काम म्हणजे स्त्रीभ्रूणहत्येविरुद्ध शोधलेल्या आय. टी. सोल्यूशनचे. सायलेंट ऑर्जव्हर किंवा अॅक्टिव ट्रॅकर या यंत्राची निर्मिती करून गर्भलिंग परीक्षा करणाऱ्या डॉक्टरांवर वेसण घालता येते व त्याद्वारे घसरलेले स्त्री जन्माचे प्रमाण वाढू शकते हे मी सप्रमाण सिद्ध केले आहे. कलेक्टर कोल्हापूर म्हणून याबाबत पथदर्शक काम केल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात याबाबत जनजागृती झाली. देशपातळीवर नॅसकॉम व 'टाईम्स ऑफ इंडिया' चा 'सोशल ऑनर' पुरस्कार - तोही अनुक्रमे मुख्यमंत्री व पंतप्रधानांच्या हस्ते मिळाल्यामुळे माझे काम वाखाणले गेले. आज माझा उपक्रम देशामधील किमान १०० जिल्ह्यात चालू आहे. माझ्या या कामामुळे काही हजारात, नव्हे - लाखात गर्भात मारल्या जाण्याऐवजी कन्या जन्मास आल्या, याचं मला अपार समाधान आहे. हे काम मला करता आलं, स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी 'आऊट ऑफ बॉक्स' उत्तर मला प्रतिभेनं शोधता आलं, या बद्दलं मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. या एका कामामुळे माझी प्रशासकीय कारकिर्द सफल झाली असं मी मानतो. फुले-कर्वेप्रमाणे मी पण स्त्रीबाबत भरीव काम केलं आहे असं माझी पत्नी म्हणते, त्यातला अतिशयोक्तीचा भाग आपण सोडून देऊ. पण स्त्री-पुरुष समतेचा विचार करताना आधी ढासळलेला सेक्स रेशो दुरुस्त करून स्त्री - पुरुषामधील किमान संख्यात्मक समता तरी यावी यासाठी मी हे काम केलं.

 दुसरं काम मी केलं ते 'ई-चावडी'. प्रत्येक तलाठ्यास लॅपटॉप व लॅपटॉपवर सात बारा व जमिनीचे पूर्ण रेकॉर्ड असं याचं स्वरूप होतं. माझा हा उपक्रम राज्याने स्वीकारला असून राज्याच्या जवळपास ८०% तलाठ्यांकडे लॅपटॉप आहेत, त्यामुळे त्यांच्या कामात पारदर्शकता, जलदता आली आहे. ग्रामीण भागासाठी याचं किती

अन्वयार्थ □ ३५९