पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भविष्यासाठी आपल्या लेखणीनं वाचकांच्या मनात विचार पेरणं हेही आम्हा साहित्यिकांचे काम आहे. त्यामुळे माझ्या लिखाणात ध्येयवाद असेल, आशावाद असेल तर तो एक साहित्यिक - कलावंत म्हणून मी माझं उत्तरदायित्व निभावत आहे असं मी म्हणेन.
परसावळे -
 आता थोडा वेगळा प्रश्न. साहित्यातून लेखकाचे आत्मचरित्र शोधू नये असं म्हणलं जातं. पण तुमच्या 'अंधेरनगरी' कादंबरीतला मुख्याधिकारी व 'ऑक्टोपस' मधला कलेक्टर तर तुमच्या स्वत:च्या जीवन व अनुभवावर बेतलेला आहे असे जाणवते. तुमचे यावर काय मत आहे?
देशमुख -
वाचकापुढे एकदा प्रकाशित झालेली कादंबरी आली की तिचा लेखकाशी संबंध संपतो असं म्हटलं जातं. ते मला सर्वस्वी मान्य आहे. कादंबरीतला अनभुव व पात्रे वाचकांना किती भावतात हे महत्त्वाचं असतं. तरीही आपल्या प्रश्नाचं मी प्रमाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
 मला हे मान्य केले पाहिजे की, या दोन कादंबरीमधले नायक मुख्याधिकारी व झालेली आहेत. मी स्वतः प्रशासक म्हणून स्वच्छ, मानवी स्पर्श देत काम करणारा व भ्रष्टाचार न करणारा आहे. तशी माझी प्रतिमा व लौकिक आहे. या दोन्ही कादंबऱ्याचे हे दोन उच्चपदस्थ अधिकारी मी तसेच रेखाटले आहेत. त्यांच्यामध्ये मी बऱ्याच अंशानं उतरलो आहे. किंबहुना ललित लेखनात लेखकाचे विचार, चिंतनाबरोबर त्याच्या जीवनातले काही अनुभव, प्रसंग व त्याला भेटलेली माणसे कधी जशीच्या तशी येतात, तर कधी त्यात कलात्मक बदल होऊन येतात. माझ्या 'अंधेरनगरी' व 'ऑक्टोपस' या दोन्ही कादंबऱ्यात मध्ये असंच काहीसं झालं आहे. पण अर्थातच वाचकांना वाचताना ही दोन पात्रे केवढी सच्ची वाटतात, मनाला भिडतात हे महत्त्वाचं. त्या दृष्टीने दोन्हीचं झालेलं स्वागत व वाचकांची खुशी पत्रं व फोन संदेशानं मला लेखनाचे मन:पूत समाधान लाभले आहे असं म्हणता येईल.
परसावळे -

 स्वच्छ चारित्र्य व दृष्टीसंपन्न रचनात्मक कार्यामुळे आपण एक श्रेष्ठ दर्जाचे अधिकारी म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाता. आपल्या प्रशासकीय क्षेत्रातील सामाजिक कार्याबद्दल काय सांगू शकाल?

अन्वयार्थ □ ३५८