पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/356

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रतिक्रिया?
देशमुख -
 हा तुमचा खराखुरा समीक्षकीय पठडीतला प्रश्न झाला. पण तुमच्या निरीक्षणाशी मी सर्वसामान्यपणे सहमत आहे. कलात्मक अभिव्यक्ती व रुळलेल्या तंत्रापेक्षा वा त्याची फारशी पर्वा न करता - विचार न करता मानवी मूल्यांचे प्रक्षेपण करणारे माझे लेखन असल्यामुळे आशयामुळे माझी लेखनशैली साकारत व घडत गेली असं मला वाटतं. मी सुबोध लेखक आहे, पण वाचकशरण नाही. सोपं-साध्या भाषेत लिहिणारा आहे. पण अशा सोप्या पण आशयसंपन्न लेखकाची प्रेमचंद व सआदत हसन मंटो ते मराठीतील आचार्य अत्रे, व्यंकटेश व ग. दि. माडगूळकर आदींची सशक्त परंपरा आहे, त्याचा मी एक अनुयायी आहे. त्यामुळे अव्यक्त मनाच्या धूसर आवर्तनाचं दळण मांडणं मला जमत नाही. माझी ती प्रकृती नाही व शैली पण. अर्थात, 'जो जो वांछील तो ते लिहो' प्रमाणे सर्व प्रकारचे साहित्य प्रकार वाचकापुढे आले पाहिजे. कारण वाचकांनाही निवडीचे स्वातंत्र्य हवे. मात्र अमुक प्रकारचं साहित्य श्रेष्ठ व इतर नाही, असा काही साहित्यिक कंपूशाहीचा जो आग्रह व प्रभाव आहे, तो मला मान्य नाही. पण अशांचे दडपण न घेता व त्यांना आवडेल की नाही याचा विचार न करता मी माझ्या स्वतंत्र शैलीनं लिहितो.

 आज सर्वत्र मूल्यांची घसरण आपण पाहात आहोत. भ्रष्टाचार, सत्ताकारण आणि कमालीचा विकृत उपभोग, हव्यास आणि पराकोटीचा व्यक्तिवाद यामुळे आपल्या भवतालचे वातावण कमालीचे प्रदूषित झाले आहे. पुन्हा पुनरुज्जीवनवादी शक्ती वरचढ होत आहेत. धार्मिक उन्मादाला खतपाणी मिळत विपरीत वळण लागलं जात आहे. झुंडशाहीमुळे सहिष्णुतेला आपण जणू काही मूठमाती दिलीय की काय असं आजचं कुंठित - भयग्रस्त वातावरण आहे. अशा अस्वस्थ व अंधारलेल्या भवतालात सिनिक - कुत्सित वा तटस्थ होणं फार सोपं आहे. कारण फक्त टीका केली की आपलं उत्तरदायित्व संपतं, असा कलावंत-साहित्यिकांचा ग्रह झाला की काय अशी मला रास्त शंका वाटते. पण मग समाज बदलायचा कोणी? संस्कृती जपायची कोणी? घटनेतील उद्देशिकेत मांडलेल्या महान लोककल्याणकारी तत्त्वांप्रमाणे वागत, कृती करत देश बदलायचा कोणी? ज्याच्याबद्दल तमाम साहित्यिकांना तुच्छता, चीड व संताप वाटतो (ही भावना रास्त आहे) त्या राजकारण्यांनी? मग आपण काय पांच वर्षातून एकदाच मतदान करून - तेही अनेकदा न करता - निवडून आलेल्यांच्या नावाने चडफडत फक्त खडे फोडायचे? मला आपल्या अनेक साहित्यिक व कलावंतांची ही शहामृगी वृत्ती साफ नामंजूर आहे. उत्कट स्वप्न पाहणे व देशाच्या उद्याच्या सुंदर

अन्वयार्थ □ ३५७