पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रिवाजाचं ज्ञान मराठवाडी माणसांना स्वाभाविकपणे असतं. मलाही ते आहे. थोडं अधिक मी ज्या शहरात लहानाचा मोठा झालो त्या उस्मानाबाद, नांदेड, परभणी व औरंगाबादामध्ये मुस्लीम समाज मोठा आहे. मला पुन्हा उर्दू - हिंदी वाचनाची बालपणापासून गोडी होती. माझे बरेच मुस्लीम मित्र होते व आहेत. त्यामुळे या समाजाला मला जवळून पाहता समजता आलं. पुन्हा वैचारिक भूमिकेमुळे मला हे भान होतं व आहे की, हा समाज फाळणीमुळे 'आयडेंटिटी क्रायसिस' मधून अजूनही जात आहे. अनेक दंगलीमुळे व शिक्षण-रोजगारात मागे पडल्यामुळे आधार व दिलाशासाठी धर्माला जास्त चिटकून रहात असल्यामुळे मुस्लीम समाज त्यातून बाहेर आला नाही असं मला वाटतं. एकसंघ देशासाठी व आपल्या हिंदू-मुस्लीम गंगाजमुनी संस्कृतीच्या रक्षणासाठी व ती दृढमूल करण्यासाठी मुस्लिमांसोबत हिंदू समाजाची तादात्म्यता हवी. माझं हे भान या समाजाकडे सहानुभूतीने पहायला मला प्रवृत्त करून गेलं असणारं. त्यामुळे त्यांच्याबाबत मी बऱ्यापैकी लेखन केलं.
 हीच बाब दलित वर्गाची. घटनेनं अस्पृश्यता नाहीशी केली तरी सवर्णांच्या एका फार मोठ्या वर्गाची मानसिकता अजूनही जुनीपुराणी व वर्णवर्चस्वाची आहे, प्रतिगामी आहे. ती मला तीव्रतेने बोचते. त्यामुळे दलित वर्गाशी माझी वैचारिक नाळ जुळलेली आहे असं मी मानतो. मुख्यत: डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या प्रचंड प्रतिभा व वैचारिक लेखनानं मी प्रभावित झालेला एक लेखक आहे. पुन्हा माझ्या तरुणपणातच मराठी साहित्यात दलित वाङ्मयाचं नवं चैतन्यमय पर्व सुरू झालं होतं. लक्ष्मण गायकवाड, गौतमीपुत्र कांबळे व दिवंगत प्र. ई. सोनकांबळेचं मैत्र माझं दलितभान सखोल करत होतं. पुन्हा प्रशासनात काम करताना दलित अत्याचारचे प्रश्न सोडवणे, त्या समाजावर अनेक गावात सामुदायिक बहिष्कार टाकला जातो, त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करणे आदीमुळेही माझ्या संवेदनशील मानवर व विचारांवर परिणाम झाला. त्यातून माझं दलितांविषयीचं लिखाण होत गेलं!
 पुन्हा मी मघाशी प्रेमचंदाचा उल्लेख केला, त्याचं स्मरण देतो. त्यांनी 'नाही रे' वर्गाच्या प्रश्नांवर लेखन केलं पाहिजे असं जाहीरपणे सांगितलं होतं. त्यांची 'कफन' ही एकच कथा त्यांची दलित शोषितांबाबतची प्रतिबद्धता सिद्ध करायला पुरेशी आहे. मी या महान लेखकाच्या विचारांचा एक छोटा समर्थक आहे. त्यामुळे मुस्लीम व दलितवर्गाच्या समस्येवर लेखन करून मी प्रेमचंद परंपरेचा आणि अभिमान बाळगावा अशा पुरोगामी परंपरेच्या पाईक आहे याचं समाधान व सार्थ अभिमान आहे.
परसावळे -
 आपली 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' ही बृहद कादंबरी दूरदर्शी व पूर्णत: जागरूक
अन्वयार्थ □ ३५५