पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याचं निवडीचं व जगण्याचं स्वातंत्र्य मला मोलाचं वाटतं. ते जपावंसं वाटतं. या विचारश्रद्धेतूनही मी आजवरचं माझ ललित लेखन केलं आहे. ही पण माझी लेखनाची एक प्रेरणा आहे.
 अंतिमतः एवढं म्हणता येईल की माझं लेखन हे माणसाच्या सुखापेक्षा दुःख - संघर्षाचे कलात्मक वर्णन वास्तवतेला सोडचिठ्ठी न देता होत असतं व पुढेही होत राहील.
परसावळे -
 आपण खुऱ्या अर्थाने समकालीन लेखक आहात असे मला वाटते. हे सहज घडत गेले का दायित्व म्हणून आपण स्वीकारले आहे?
देशमुख -
 तुम्हाला मी आजच्या वर्तमानाला अर्थात समकालीन लेखक वाटतो ही माझ्यासाठी सकारात्मक कॉम्प्लीमेंट आहे असे मी मानतो. याचे उत्तर सोपं नाही. पण ते देण्याचा प्रयत्न करतो. मराठी वाचकांना पुराण - इतिहासात रमायला आवडतं. राजकीय नेते हे जाणून मतपेटीसाठी 'पुनरुज्जीवनवादा' ला उजाळा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या काळाचे व त्याकाळच्या नायकांना देवत्व बहाल करणारे लेखन बरेच होत आहे. दुसरा लेखनाचा प्रकार म्हणजे 'नॉस्टेल्जीक' होत गेलेल्या लेखनाचा. मला वाटतं की, मराठी माणूस अजूनही भूतकाळात जास्त रमतो. त्यामुळे लेखकही तसं लिहीत असतील. पण माझी स्मरणरंजनाची व इतिहास - पुराणात रमण्याची वृत्ती नाही. त्यामुळे त्यापासून मी बचावलो आहे. भविष्यात मला काश्मीर समस्या, हैद्राबाद मुक्ती संग्राम व जात-धर्म संघर्ष चितारणारी एक ऐतिहासिक कादंबरी - असं ऐतिहासिक स्वरूपाचं जरूर लिहायचं आहे, पण त्यातला विचार व प्रेरणा आजच्या आधुनिक संवेदनाच्या असतील, हे मी खात्रीनं सांगेन. त्यामुळे मी भूतकाळात रमणारा लेखक नाही, तसेच विज्ञानकथा लेखकांप्रमाणे भविष्याचा वेध घेणारा लेखक नाही.

 मी खऱ्या अर्थाने वर्तमानात जगणारा व आजच्या काळाचं प्रॉडक्ट असलेला मी एक माणूस व एक लेखक आहे. सबब तुम्ही मला समकालीन लेखक म्हणू शकता. इथं कदाचित एक धोका माझ्यासारख्या समकालीन लेखकाबाबत उद्भवतो. तो हा, की उद्या हे साहित्य शिळं तर होणार नाही? माझं उत्तर साफ आहे. कालिदास, शेक्सपिअर, प्रेमचंद व मंटोसारखे कालजयी लेखक पण आज किती वाचले जातात? त्यामुळे भविष्यकाळातील वाचकाची मी बिलकुल चिंता करीत नाही. आज जो माझ्या भोवतालचा समाज आहे, माणसं आहेत, त्यांच्यात मी गुंतलेला असतो. लेखक म्हणून तसेच कलावंत म्हणून त्यांच्या खाजगी जीवनाविषयी मला निकोप कुतूहल

३४८ □ अन्वयार्थ